खेड: फुरूसच्या शाकिर तिसरेकर यांनी ऑस्ट्रेलियातून आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मिळवली पदव्युत्तर पदवी

Gramin Varta
129 Views

खेड: फुरूस येथील रहिवासी आणि मुंबईतून बी.टेक. पदवी पूर्ण केलेले शाकिर हिशामउद्दीन तिसरेकर यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात एक मोलाचा टप्पा गाठला आहे. शाकिर यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील युटीसी (UTC) विद्यापीठातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) या विषयात उच्च श्रेणीसह (हायर फर्स्ट क्लास) आपली पदव्युत्तर पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वेगाने विकसित होणारे आणि क्रांती घडवणारे क्षेत्र मानले जाते.

या आव्हानात्मक क्षेत्रात शाकिर यांनी मिळवलेले यश त्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि जिद्दीचे फलित आहे. शाकिर यांच्या या यशात त्यांचे वडील हिशामउद्दीन अमीन तिसरेकर आणि आई शबनम तिसरेकर यांचा मोलाचा वाटा आहे. स्वतः मुंबई विद्यापीठाचे पदवीधर असलेल्या त्यांच्या पालकांनी उच्च शिक्षणाचे महत्त्व ओळखून शाकिर यांना सातत्याने प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस खंबीर पाठिंबा दिला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाकिर यांचे सर्वत्र कौतुक होत असून, फुरूस गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *