चिपळूण (प्रतिनिधी):- आपण स्वतः उद्योग क्षेत्रातून आल्यामुळे उद्योजकांच्या समस्या आणि अडचणी जवळून अनुभवल्या आहेत. औद्योगिक वापरासाठी धरणांमधून पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव शासनाकडे मांडण्यात येईल तसेच पाणीटंचाईचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच लोटे-परशुराम औद्योगिक क्षेत्राची प्रदूषणामुळे निर्माण झालेली नकारात्मक प्रतिमा बदलण्यासाठी शासनस्तरावर ठोस उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन आमदार प्रमोद जठार यांनी केले.
तालुक्यातील लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आमदार प्रमोद जठार यांनी उद्योग भवन सभागृहात उद्योजक आणि विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी उद्योजक संघटनेतर्फे आमदार जठार यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीत लोटे औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांसमोर उभ्या असलेल्या पाणी, वीज, प्रदूषण, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासाशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उद्योजकांनी आपल्या अडचणी थेट आमदार जठार यांच्यासमोर मांडल्या.
यावर बोलताना आमदार जठार यांनी किनारपट्टी भागातील वीजवाहिन्या टप्प्याटप्प्याने भूमिगत करण्याची योजना सुरू असून उद्योगांना अखंड वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. कोकणात अधिकाधिक उद्योग आणून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि स्थलांतर रोखणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सांगत, आंदोलन नव्हे तर समस्यांचे समाधान हेच सरकारचे धोरण आहे, असे आमदार प्रमोद जठार यांनी नमूद केले.
बैठकीत उद्योजकांनी पाणी, वीज, प्रदूषण आणि पायाभूत सुविधांबाबतच्या विविध समस्या मांडल्या. या सर्व प्रश्नांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन देताना लोटेतील उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनामार्फत निश्चित प्रयत्न केले जातील; मात्र औद्योगिक प्रदूषण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिकाही आमदार जठार यांनी व्यक्त केली.
यावेळी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, राजू रेडीज, लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. राज आंब्रे, प्रशांत पटवर्धन आदी उपस्थित होते.
लोटे औद्योगिक क्षेत्राची नकारात्मक प्रतिमा बदलणार : आ. प्रमोद जठार
Leave a Comment
