खेड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश युवती काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सुप्रिया सखाराम कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या उधव सोनवणे यांनी नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली.
नियुक्तीपत्रानुसार, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल तसेच प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करणे, पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळातील महिलांपर्यंत व युवतींपर्यंत पोहोचविणे आणि पक्षवाढीसाठी प्रभावीपणे काम करावे, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल सुप्रिया कदम यांचे पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध स्तरातून अभिनंदन होत असून, आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसची संघटनात्मक बांधणी अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
