भोस्ते घाटातील महामार्गाच्या धोकादायक भेगांची महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

Gramin Varta
86 Views

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील खेडजवळील अत्यंत संवेदनशील अशा भोस्ते घाटात रस्त्याला पडलेल्या धोकादायक भेगांची आज महसूल, गृह (शहरे), ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. भर पावसाळ्यात रस्ता खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराला तातडीने घटनास्थळी पाचारण करत कामाचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला.

तात्पुरती मलमपट्टी नको, कायमस्वरूपी काम करा

पाहणी दरम्यान ठेकेदाराने या गंभीर भेगांवर केवळ तात्पुरती मलमपट्टी केल्याचे निदर्शनास आले. या निष्काळजीपणावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत ठेकेदाराला आणि प्रशासनाला राज्यमंत्री श्री कदम यांनी खडे बोल सुनावले. “वाहनचालकांच्या जीवाशी खेळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. तात्पुरती डागडुजी बंद करा आणि या ठिकाणी तातडीने कायमस्वरूपी व अत्यंत दर्जेदार काम पूर्ण करा,” असे स्पष्ट व कडक निर्देश यावेळी त्यांनी दिले.
   ते म्हणाले, भोस्ते घाटातील या भेगांची भूगर्भशास्त्रज्ञ आणि तांत्रिक तज्ज्ञांकडून सखोल तपासणी करून घ्यावी आणि त्यानुसारच कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम हाती घ्यावे.

सुरक्षित वाहतूक: काम सुरू असताना या मार्गावरील वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना (दिशादर्शक, सुरक्षा रक्षक, बॅरिकेड्स) राबविण्यात याव्यात.

दोषींवर कारवाई: महामार्गासारख्या महत्त्वाच्या रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांवर आणि हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित यंत्रणेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, महामार्ग पोलीस दलाचे जवान आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *