रत्नागिरी जिल्ह्यात पुढील पाच दिवस मध्यम पावसाची शक्यता; शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला

Gramin Varta
9 Views

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आगामी १८ ते २२ जुलै दरम्यान बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या अंदाजानुसार, या काळात कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच, १७ जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या हवामान स्थितीचा विचार करून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने शेतकऱ्यांसाठी विशेष कृषी सल्ला जारी केला आहे.

ज्या भागात पावसाच्या कमतरतेमुळे भात खाचरातील पाण्याची पातळी कमी झाली आहे, अशा ठिकाणी उपलब्ध जलस्रोतांमधून पाणी वळवून चिखलणी व पुनर्लागवडीसाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भात लावणी करताना ती १५ सें.मी. x १५ सें.मी. किंवा २० सें.मी. x १५ सें.मी. अंतरावर आणि २.५ ते ३.५ सें.मी. खोलीवर करावी, जेणेकरून फुटवे चांगले येतील. दमट हवामानामुळे भात पिकात निळ्या भुंग्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकर्‍यांनी पिकावर नियमित लक्ष ठेवावे आणि प्रादुर्भाव दिसल्यास कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीटकनाशकांची फवारणी करावी. फवारणी करताना पाऊस नसल्याची खात्री करून आणि द्रावणात स्टिकरचा वापर करणे गरजेचे आहे.

नागली आणि वरी पिकाच्या रोपवाटिकेतील पेरणीला १५ दिवस पूर्ण झाले असल्यास प्रति गुंठा १ किलो युरिया खताचा दुसरा हप्ता देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आंबा, काजू, सुपारी आणि नारळ या बागांमध्ये दमट हवामानामुळे फांदीमर, कोळेरोग व कोंब कुज यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सीक्लोराईड किंवा बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. काजू बागेत खोडकिडीचे निरीक्षण करून आवश्यकतेनुसार उपाययोजना कराव्यात. हळद पिकास लागवडीनंतर दीड महिन्यांनी युरिया खताचा पहिला हप्ता द्यावा आणि वेलवर्गीय भाजीपाल्यासाठी मांडपाची व्यवस्था करावी. पावसाळ्यात शेळ्यांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यामुळे पशूंमध्ये अतिसार किंवा वजन घटणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून उपचार करावेत, असेही कृषी विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व खतांची मात्रा जमिनीत पुरेसा ओलावा असताना आणि पावसाची तीव्रता कमी असतानाच द्यावी, असा इशाराही देण्यात आला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *