विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद; प्रकाश आंबेडकरांची घोषणा

Gramin Varta
249 Views

मुंबई: दिल्लीत नीट (NEET) परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा करत भाजपसोबत जाण्याची भूमिका नसलेल्या सर्व राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी आणि नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. हा बंद पूर्णपणे शांततापूर्ण असेल आणि कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ दिली जाणार नाही. कार्यकर्त्यांच्या सहकार्याने बंद शांततेत पार पाडला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना ॲड. आंबेडकर यांनी नीट परीक्षा प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. पहिली परीक्षा चुकीच्या पद्धतीने पार पडली असून फेरपरीक्षेतही अनेक त्रुटी असल्याचा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असून सरकारच्या भूमिकेमुळे शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे ते म्हणाले. या धोरणाविरोधात देशभर जनआंदोलन उभे राहिले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारावर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार केला असून दिल्लीत जनरल डायर पुन्हा जिवंत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिक्षा झाली की दृष्टिकोन बदलतो, मात्र सरकारची तशी मानसिकता दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आरएसएस लोकशाहीवर विश्वास ठेवत नाही, तर ठोकशाहीवर विश्वास ठेवतो, अशी टीकाही त्यांनी केली.

जनआंदोलन हे असे आंदोलन असते की ज्याला मोठमोठे डायरही घाबरतात. त्यामुळे विरोधी पक्षांनी हे आंदोलन देशभर उभे करावे आणि सर्वसामान्य जनतेचा राग बाहेर आला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. सदाभाऊ खोत यांनी नीट पेपरफुटी प्रकरणातील आंदोलकांना दहशतवादी म्हटल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांनी सरकारलाच दहशतवादी प्रवृत्तीचे असल्याचा आरोप केला. मुंबईतील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे बेकायदेशीर असून ते न्यायालयात टिकणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

विद्यार्थ्यांवरील लाठीमारामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून विविध जिल्हास्तरीय आणि प्रादेशिक संघटनांशी चर्चा केल्यानंतर २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या बंदला सर्व विरोधी पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Total Visitors :
4572133
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *