राज्यात पावसाचा जोर वाढला;कोकणात २७ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

Gramin Varta
117 Views

पुणे : राज्यभर पावसाचा जोर पुन्हा वाढला असून २७ जुलैपर्यंत पावसाचा मुक्काम कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, बुधवारी (२२ जुलै) पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोकणासह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुसरीकडे राज्यातील इतर भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने खरीप पिकांना दिलासा मिळत असून शेतकऱ्यांची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणात २७ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्रात २२ जुलै रोजी अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला असून त्यानंतर २३ ते २७ जुलैदरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भात २३ ते २७ जुलैदरम्यान यलो अलर्ट देण्यात आला असून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यातही याच कालावधीत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. मंडणगड येथे १७० मिमी, लांजा १०७ मिमी, चिपळूण १०५ मिमी, खेड ९८ मिमी, संगमेश्वर (देवरूख) ९४ मिमी, गुहागर ८७ मिमी, राजापूर ७७ मिमी आणि दापोली येथे ६८ मिमी पावसाची नोंद झाली. घाटमाथा भागात कोयना येथे सर्वाधिक १७१ मिमी, भिरा येथे १५० मिमी, ताम्हिणी येथे १०२ मिमी तर महाबळेश्वर येथे १०८ मिमी पाऊस झाला. पुढील काही दिवस कोकण आणि घाटमाथा भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या भागातील नागरिकांनी तसेच डोंगराळ परिसरातील रहिवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitors :
4572135
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *