रत्नागिरी-चिपळूण एसटी बस न सोडल्याने प्रवाशांचे हाल; तासन्‌तास प्रतीक्षा करून प्रवासी संतापले

Gramin Varta
116 Views

रत्नागिरी : रत्नागिरी-चिपळूण मार्गावरील एसटी बससेवेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास रत्नागिरीहून सुटणारी बस वेळेत न आल्याने नोकरदार, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यात तासन्‌तास बसस्थानकावर उभे राहूनही बस मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सायंकाळी ६ ते ८ या गर्दीच्या वेळेत एकही नियमित एसटी वेळेवर सुटत नसल्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज रत्नागिरीहून चिपळूणकडे जाणारे प्रवासी सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत बसस्थानकात ताटकळत थांबतात; मात्र दीर्घ प्रतीक्षेनंतरही चिपळूणकडे जाणारी एकही एसटी उपलब्ध होत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे अखेर नाईलाजास्तव खिशाला अतिरिक्त झळ सोसत खाजगी लक्झरी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.

दररोज नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी या मार्गावर प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांचे हाल होत असून, परतीच्या गर्दीच्या वेळेतच एसटी महामंडळाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. विशेषतः मुसळधार पावसाच्या काळात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना तासन्‌तास बसस्थानकात उभे राहावे लागत असल्याने संताप अधिकच वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-चिपळूण मार्गावर सायंकाळच्या वेळेत किमान दर अर्ध्या तासाने बससेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. रत्नागिरी आगार प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष घालून वेळापत्रकानुसार बसेस सोडाव्यात, अन्यथा प्रवाशांचा वाढता रोष एसटी महामंडळासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *