राजापूरच्या दळणवळणाला मिळणार गती: दोन महत्त्वाच्या पुलांसाठी ३.५५ कोटींचा निधी मंजूर; आमदार किरण भैय्या सामंत यांच्या प्रयत्नांना यश

Gramin Varta
122 Views

राजापूर (प्रतिनिधी): राजापूर तालुक्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील रस्ते व पुलांची दुरवस्था दूर करण्यासाठी आमदार किरण भैय्या सामंत यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. तालुक्यातील दोन अत्यंत महत्त्वाच्या पुलांच्या बांधकामासाठी राज्य शासनाकडून ३.५५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला असून, या निर्णयामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या मंजूर निधीतून अर्जुना नदीवर आणि ओणी-तोरणवाडी परिसरात नवीन पुलांची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने अर्जुना नदीवरील (MDR-45) तळवडे बौद्धवाडी ते इंजिनवाडी रस्ता साखळी क्रमांक ५/७०० येथे नवीन पूल बांधण्यासाठी २.५१ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. तसेच, ओणी तोरणवाडी बौद्धवाडी ते चिखलगाव बौद्धवाडी रस्त्यावरील साखळी क्रमांक १/२०० येथील पुलाच्या नवीन बांधकामासाठी १.०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार किरण भैय्या सामंत यांनी शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे ही दोन्ही कामे मार्गी लागली आहेत.

ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांना मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी हे पूल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. विशेषतः पावसाळ्यात निर्माण होणारी दळणवळणाची कोंडी या पुलांच्या बांधकामांमुळे कायमची सुटण्यास मदत होणार आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या आमदार सामंत यांच्या पुढाकारामुळे ही कामे मंजूर झाल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी त्यांचे जाहीर आभार मानले आहेत. या दोन्ही पुलांचे प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार असून, यामुळे राजापूरच्या ग्रामीण भागातील वाहतूक अधिक सुखकर होणार आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *