मुंबई: राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली.
मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली दुग्धविकास विभागाच्या १५० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठक घेण्यात आली.
यावेळी दुग्धविकास विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महानंदाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर यांच्यासह राज्यातील प्रमुख दूध संघांचे प्रतिनिधी (ऑनलाईन) उपस्थित होते.
या बैठकीत दूध संघाच्या प्रतिनिधींनी अनेक सूचना केल्या. यामध्ये राज्यात दुधाला समान दर, एक राज्य एक ब्रँड, एक जिल्हा एक दूधसंघ तसेच एक गाव एक दूध संस्था स्थापन करण्याची मागणी प्रतिनिधि नी केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे मंत्री अतुल सावे म्हणाले.
मुंबईतील आरे स्टॉलचे अत्याधुनिकरण करण्यात येईल. असे श्री, सावे यांनी सांगितले.
दूध संकलनासाठी शेतकरी प्रोड्युसर कंपन्याची मदत घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल. महानंदाद्वारे अधिकाधिक दूध संकलन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना यावेळी करण्यात आली.
Category: बातम्या
-

दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा – मंत्री अतुल सावे
-

रत्नागिरी : नित्या प्राणिक हिलिंग सेंटरच्या प्राणिक शेतीवरील विशेष कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद
रत्नागिरी: येथील नित्या प्राणिक हिलिंग सेंटरच्या वतीने शेतकऱ्यांसाठी प्राणिक शेतीवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या विशेष कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून अहमदाबाद येथील डॉ. विशाल पटेल उपस्थित होते. त्यांना प्राणिक हिलिंगचा १५ वर्षे व प्राणिक शेतीचा १२ वर्षांचा अनुभव आहे. नित्या प्राणिक हिलिंग सेंटरचे प्रमुख तेजस महागावकर यांनी डॉ. पटेल यांचे स्वागत केले.
प्रशिक्षक डॉ. विशाल पटेल यांनी प्राणिक शेतीवर विशेष मार्गदर्शन केले. प्राणिक शेतीवरील त्यांचे अनुभव कथन केला. या विशेष कार्यक्रमाला नित्या प्राणिक हिलिंग सेंटरचे प्रमुख तेजस महागावकर, शेतकरी,आंबा, काजू बागायतदार उपस्थित होते. रत्नागिरीतील नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
येत्या २५ व २६ जून २०२५ रोजी बेसिक प्राणिक हिलिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन नित्या प्राणिक हिलिंग सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे. -

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे
मत्स्यालय प्रवेश करिता डिजिटल पेमेंट प्रणाली सुरुरत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत रत्नागिरी येथे असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी’ अंतर्गत एक प्रेक्षणीय असे ‘मत्स्यालय आणि मत्स्य संग्रहालय’ विद्यार्थी आणि पर्यटकांकरिता झाडगाव, रत्नागिरी येथे सुरु आहे. या मत्स्यालय व संग्रहालयास भेट देणाऱ्या पर्यटकांनी डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा निर्माण करण्याची विनंती केली होती. दिनांक १८ जून २०२५ रोजी पर्यटक आणि विविध कार्यालयीन पेमेंट करिता डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. संशोधन केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. आशिष मोहिते यांच्या हस्ते पूजा करून पी.ओ.एस. मशिन चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डिजिटल पेमेंट प्रणालीद्वारे प्रथम तिकीट डॉ. स्वप्नजा मोहिते यांना देऊन सुरुवात करण्यात आली. पर्यटकांनी यु.पी.आय. पेमेंट, डेबिट किंवा क्रेडीट कार्ड द्वारे पेमेंट करून या सोयीचा सर्व पर्यटकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. आशिष मोहिते, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांनी केले. डिजिटल पेमेंट करिता आवश्यक पी.ओ.एस. मशिन, भारतीय स्टेट बँक, रत्नागिरी यांनी निशुल्क पुरविल्या बद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
सदर ‘ऑनलाईन पेमेंट प्रणाली’ सुरु करण्याकरीता डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. आशिष मोहिते यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. आसिफ पागारकर (सहयोगी संशोधन अधिकारी व प्राध्यापक), डॉ. हरिष धमगये (अभिरक्षक व प्राध्यापक), प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम व प्रा. कल्पेश शिंदे (सहाय्यक संशोधन अधिकारी), श्रीम. व्ही. आर. सदावर्ते (जीवशास्त्रज्ञ) तसेच श्री. रमेश सावर्डेकर (वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक), श्री. महेश किल्लेकर (यंत्र चालक बोट) व श्री. दिनेश कुबल (बोटमन), श्रीम. जाई साळवी (वरिष्ठ लिपिक), श्री. सचिन पावसकर (लिपिक), श्री. मनिश शिंदे (मत्स्यालय यांत्रिक), श्री. सुहास कांबळे व श्री. राजेंद्र कडव (शिपाई), श्री. प्रवीण गायकवाड (क्षेत्र संग्राहक), श्री. सचिन चव्हाण (मजूर), श्री. स्वप्नील आलीम, श्री. तेजस जोशी, श्री. योगेश पिलणकर, श्री. उल्हास पेडणेकर, श्री. दर्शन शिंदे, व श्री. प्रशांत पिलणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
-

चिपळुणात मुसळधार पावसामुळे पडझड; तळसर येथे घरावर भिंत कोसळली
चिपळूण: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, काही ठिकाणी किरकोळ पडझडीच्या घटना घडल्या आहेत. वाशिष्ठी आणि शिवनदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने काही ठिकाणी पाणी पात्राबाहेर आले होते. काल, बुधवारी (१८ जून) झालेल्या पावसामुळे चिपळूण तालुक्यात सरासरी २३.५६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
या पावसामुळे मोठे नुकसान झाले नसले तरी, पडझडीचे काही प्रकार समोर आले आहेत. मौजे तळसर येथील अजय जयराम माहिते यांच्या घराबाहेरची भिंत कोसळून घराचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच, मार्गताम्हाणे येथील रवींद्र देवजी तांबिटकर यांच्या मालकीचा गोठा कोसळून नुकसान झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.
काल दिवसभरात चिपळूण मंडळात ७ मि.मी., खेर्डी २१ मि.मी., वहाळ ४० मि.मी., कळकवणे १५ मि.मी., मार्गताम्हाणे २२ मि.मी., शिरगाव ३४ मि.मी., रामपूर २६ मि.मी., असुर्डे २४ मि.मी. आणि सावर्डे २३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण ४७८ मि.मी. पाऊस पडला आहे.
सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असते त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून, आवश्यकतेनुसार मदतकार्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-

संगमेश्वर चिखली येथे घरात घुसलेल्या अजगराने कोंबडी केली फस्त, सर्पमित्राने दिले जीवदान
संगमेश्वर : तालुक्यातील चिखली बौध्दवाडी येथे घरात घुसलेल्या अजगराला सर्पमित्र अक्षय मोहिते व ग्रामस्थांनी सुरक्षीत पकडून जीवदान दिले. अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
संगमेश्वर तालुक्यातील चिखली बौद्धवाडी येथील विकास मोहिते यांच्या घरात मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास अचानक अजगराने प्रवेश करून कोंबड्यावर हल्ला करत एका कोंबडीला गिळंकृत केले. दुसऱ्या कोंबडीला पकडणार इतक्यात कोंबड्यांचा कलकलाट सुरू झाला. त्याचवेळी विकास मोहिते व घरातील मंडळींनी धाव घेतली असता त्यावेळी त्यांना भला मोठा अजगर दिसून आला. तात्काळ त्यांनी सर्पमित्र अक्षय मोहिते याला बोलावण्यात आले. अक्षय याने कोणतीही इजा न होता अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. आठ फुट लांबीचा अजगर होता. अजगराला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली -

खेड: भरणेजवळ डंपरची स्कूल बसला धडक; मोठा अनर्थ टळला
खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे गावाजवळ बुधवारी (१८ जून) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास खेड नगर परिषदेच्या कचरावाहू डंपरने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसला जोरदार धडक दिली. या अपघातात सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नसली तरी, पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खेडच्या दिशेने येणाऱ्या नगर परिषदेच्या डंपरने भरणे येथील एका शाळेच्या बसला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि वाहतूक काही काळ थांबली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कुणाला गंभीर दुखापत झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे. तरीही, मुलांची वाहतूक करणाऱ्या बसला डंपरने धडक दिल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालक धास्तावले असून, अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. वाहतुकीचे नियम पाळून आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांबाबत अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे. -

रत्नागिरी जिल्ह्यात सार्वजनिक मालमत्तांचे दीड कोटींचे नुकसान
रत्नागिरी: दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्यात सार्वजनिक मालमत्तांचे दीड कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच जिल्ह्यातील अंशत: आणि पूर्णत: अशा एकूण 130 घरांचे सुमारे 44 लाखांचे नुकसान झालेले आहे. पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. काही घटनांत जिवीतहानी देखील झालेली आहे. या कालावधीत पाण्यात बुडुन आणि वीज पडुन दोघांचा मृत्यू झाला. तर संरक्षक भिंत कोसळुन व अन्य घटनांनी पाच जखमी झाले. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, रस्ते खचले, पुलांना बाधा झाली, झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. याबाबतचा जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत झालेल्या नुकसानीच अहवाल तयार करण्यात आला आहे.
अंशत: कच्चे 2 घरांचे 93 हजाराचे नुकसान झाले आहे. तर अंशत: 128 पक्क्या घरांचे सुमारे 43 लाखाचे नुकसान झाले आहे. तर तीन पुर्णत: गोठ्यांचे 71 हजार व 13 अंशत गोठ्यांचे 6 लाख 26 हजार एवढे नुकसान झाले आहे. पशुधनामध्ये 1 जणावर दगावले आहे. एनडीआरएमचे 1 पथक रत्नागिरीत आहे. -

सिंधुदुर्गच्या साकेडी गावात दुर्मिळ ‘दुग्धपाण सतीशिळे’चा शोध; मध्ययुगीन सतीप्रथेवर नव्याने प्रकाश
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील साकेडी गावामध्ये, लिंगेश्वर-गांगोबा मंदिर परिसरात २५ मे २०२५ रोजी करण्यात आलेल्या संशोधनादरम्यान इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशा १५ सतीशिळांचा समूह आढळून आला आहे. विरगळ व सतीशिळा अभ्यासक स्नेहल बने यांनी केलेल्या या सखोल अभ्यासामध्ये अनेक प्रकारच्या सतीशिळा समोर आल्या असल्या, तरी त्यात विशेषत्वाने लहान मुलाला दुग्धपान (स्तनपान) करतानाचे शिल्प असलेली एक वैशिष्ट्यपूर्ण सतीशिळा त्यांच्या निदर्शनास आली आहे. ही दुर्मिळ सतीशिळा मध्ययुगीन सतीप्रथेच्या विविध पैलूंवर नव्याने प्रकाश टाकणारी ठरणार आहे.
सतीप्रथेचे विविध पैलू आणि दुग्धपाण सतीशिळेचे महत्त्व:
स्नेहल बने यांनी या वैशिष्ट्यपूर्ण सतीशिळेबद्दल सविस्तर माहिती दिली. सतीची चाल ही मध्ययुगीन भारताची एक प्रमुख सामाजिक विशेषता होती. पतीच्या निधनानंतर पत्नीने स्वतःला अग्नी समर्पित करण्याची ही एक जुनी परंपरा होती. जरी प्राचीन धर्मग्रंथांमध्ये या प्रथेचे फारसे स्पष्ट वर्णन नसले, तरी समाजमान्य रूढी म्हणून ती सर्व प्रांतांमध्ये प्रचलित होती.
सती जाण्यामागे अनेक कारणे होती. काही स्त्रिया पतीवरील असीम प्रेमापोटी स्वेच्छेने अनुमरण पत्करत असत. तर मध्ययुगीन काळात सती जाणे हे प्रतिष्ठेचे आणि उच्च नैतिकतेचे लक्षण मानले जाऊ लागले. पुनर्विवाहास त्याज्य मानले गेल्याने, कुटुंबातील ज्येष्ठांचे आणि समाजाचे दडपणही अनेक स्त्रियांना सती जाण्यास भाग पाडे. पतीपश्चात होणारी कुचेष्टा, अवहेलना, परावलंबित्व आणि सासर-माहेरकडून मिळणारी उदासीनता अशा अनेक कारणांमुळे स्त्रियांना नाइलाजाने सती जावे लागत असे.
शास्त्र आणि रूढींचा संघर्ष:
महत्त्वाचे म्हणजे, प्राचीन धर्मग्रंथांमध्ये ज्या स्त्रीला दूध पिणारे बालक आहे किंवा जी स्त्री गर्भवती आहे, अशा स्त्रीने सती जाऊ नये, असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. तसेच, मासिक पाळी सुरू असलेल्या स्त्रीसाठी सती जाण्यापूर्वी शुचिर्भूत होण्याचे काही नियम सांगितले होते, ज्यात १० किलो तांदूळ दळणे किंवा गायी दान करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होता. सद्गुरूचरित्र आणि महानुभव ग्रंथांमध्येही सतीप्रथेबद्दल आणि गर्भवती किंवा लहान बाळे असलेल्या स्त्रियांनी सती न जाण्याबद्दल उल्लेख आढळतो. गरुड पुराणांमध्ये सुद्धा गर्भवती स्त्रीने सती जाऊ नये असा उल्लेख आहे.
सद्गुरूचरित्रामध्ये सतीप्रथेबद्दल केलेले वर्णन
जवळ नसता आपुला पति।
त्याती जाहली असेल मृत्यूप्राप्ती।
काय करावे त्याचे सती।
केवी कराये सहगमन।
तुवा असेल गरोदरी।
असे तान्हा कुमार कुमरी।
काय करावे तैसिये नारी।अलबेरूनीसारख्या इतिहासकारांनी नोंदवले आहे की, भारतात राण्यांनी सती जावे अशी अपेक्षा राज्यकर्ते करत असत. सती प्रथा प्रामुख्याने राजघराण्यांमध्ये आणि सरदार घराण्यांमध्ये अधिक अस्तित्वात होती. सती जाणारी स्त्री ‘पतिव्रता’ म्हणून समाजात आदरणीय मानली जात असे आणि सती जाणे हे एक प्रकारचे पुण्यकर्मच मानले जाई. अशा पुण्यवान स्त्रियांच्या त्यागाची आठवण म्हणून त्यांची स्मारके किंवा सतीशिळा बनवण्याची पद्धत त्याकाळी समाजात होती.
संशोधन कार्य आणि सहकार्य:
सदर संदर्भासाठी इतिहास अभ्यासक व विरगळ आणि सतीशिळा शास्त्रज्ञ श्री. अनिल दुधाने सर यांच्या ‘इतिहासाचे मूक साक्षीदार: विरगळ आणि सतीशिळा’ या पुस्तकातून मार्गदर्शन घेण्यात आल्याचे अभ्यासक स्नेहल बने यांनी सांगितले. दुधाणे सरांच्या मार्गदर्शनाखाली इतर सतीशिळांचे अधिक अभ्यास कार्य चालू असल्याचेही बने यांनी नमूद केले.
या संशोधन कार्याला लिंगेश्वर-गांगोबा मंदिरातील पुजारी वर्ग भिकाजी शंकर गुरव व राजाराम गुरव, तसेच ग्रामस्थ श्यामसुंदर राणे, विजय राणे, मुरारी राणे, महादेव राणे, लक्ष्मण राणे, अपूर्वा राणे या मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले, असे अभ्यासक श्रीमती स्नेहल बने यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले. या दुर्मिळ शोधामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ऐतिहासिक आणि सामाजिक अभ्यासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.