३०० कोटींपैकी ४२ कोटींचाच निधी मिळाल्याने अनेक लाभार्थी अडचणीत
रत्नागिरी : सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली ‘सिंधुरत्न समृद्ध योजना’ आता कालबाह्य झाली असून, सद्यस्थितीत ती थांबवण्यात आली आहे. शासनाने या योजनेच्या फलनिष्पत्ती अहवालाची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. मात्र, योजनेसाठी मंजूर झालेल्या ३०० कोटींपैकी फक्त ४२ कोटी रुपयांचाच निधी मिळाला असल्याने अनेक लाभार्थी अडचणीत आले आहेत.
या योजनेतून पर्यटन, व्यवसाय वृद्धी आणि स्थानिक विकासासाठी विविध उपयोजनांना चालना देण्यात आली होती. मात्र योजनेचा कालावधी संपल्याने ती मुदतवाढ मिळणार की कायमस्वरूपी बंद होणार, यावरच लाभार्थ्यांना शिल्लक लाभ मिळेल की नाही, हे ठरणार आहे.
२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘चांदा ते बांदा’ ही योजना बंद करून ‘सिंधुरत्न समृद्ध योजना’ सुरू केली होती. ही योजना केवळ तीन वर्षांसाठी मंजूर करण्यात आली होती. प्रत्यक्ष अंमलबजावणी २०२२-२३ मध्ये सुरू झाली आणि सिंधुदुर्ग व रत्नागिरीसाठी प्रत्येकी १५० कोटींचा, म्हणजे एकूण ३०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता.
योजनेची मुदत संपुष्टात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे मुदतवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. यासंदर्भात शासनाच्या नियोजन विभागाचे उपसचिव एन. बी. खेडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे फलनिष्पत्ती अहवाल मागविला आहे. यासाठी यशदा, पुणे किंवा नामवंत बाह्य संस्था यांच्या मदतीने अभ्यास व मूल्यांकन करुन तत्काळ शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आता या अहवालावरच योजनेच्या भवितव्याचा निर्णय होणार असून, लाभार्थ्यांना पुढील लाभ मिळणार की नाही, याबाबत संदिग्धता कायम आहे.
Category: बातम्या
-

सिंधुरत्न योजना थांबली; लाभार्थ्यांचा संभ्रम कायम
-

दाभोळमध्ये शिंदे शिवसेनेचा महावितरण कार्यालयावर ‘हल्लाबोल’
वाढीव बिलांचा आणि वीज खंडित होत असल्याने नागरिक संतप्त
दाभोळ: दाभोळ येथील महावितरणच्या अनागोंदी कारभाराला कंटाळलेल्या नागरिकांनी आज शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर धडक देत ‘हल्लाबोल’ मोर्चा काढला. वाढीव वीजबिले आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
गेल्या काही दिवसांपासून दाभोळमधील जनतेला महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात दिवसातून अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याआधीही नागरिकांनी कार्यालयात येऊन जाब विचारला होता, मात्र परिस्थितीत सुधारणा न झाल्याने आज शिवसेनेने थेट महावितरणचे अधिकारी विवेक येलवे यांना घेराव घालत जाब विचारला.
एकिकडे महावितरणकडून भरमसाट बिले दिली जात असताना, दुसरीकडे वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याबद्दल शिवसेनेने तीव्र संताप व्यक्त केला. १० ते १५ दिवस वीज नसतानाही जास्त बिले का येतात, असा सवालही यावेळी विचारण्यात आला. तसेच, महावितरणच्या नियंत्रण कक्षातील अधिकारी फोन उचलत नसल्याने तक्रार कुठे करावी, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला.
या सर्व तक्रारींवर तातडीने उपाययोजना करून गावातील सर्व भागांमध्ये अखंडित वीजपुरवठा करण्याची मागणी शिवसेनेने केली. अन्यथा, पक्षाकडून कठोर भूमिका घेत जनतेसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व स्तरांवर योग्य ती उपाययोजना सुरू असून आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली. येणाऱ्या दिवसात या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. मात्र, वीजपुरवठा तत्काळ नियमित न झाल्यास महावितरण कार्यालयाला पुन्हा घेराव घालण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
-

समाज कल्याण विभागामार्फत सामाजिक न्याय दिन साजरा
गरिबा घरच्या घोंगड्याला शेतकऱ्यांच्या बांधाला राजसिंहासन मानणारे खरे लोकराजे – जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते
रत्नागिरी : अवघ्या 28 वर्षाच्या कालखंडात बहुजन समाजाच्या उद्धारासाठी विशेषत: समाजातील वंचित, बहिष्कृत वर्गासाठी राजेशाहीत समतेची लोकशाही निर्माण करणारे छत्रपती शाहू महाराज होते. गरिबांच्या घरी, शेतकऱ्यांच्या बांधावर राजसिंहासन घेऊन जाणारे किंबहुना गरिबाघरच्या घोंगड्याला शेतकऱ्यांच्या बांधाला राजसिंहासन मानणारे छत्रपती शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने लोकराजे होते, अशा शब्दात जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी त्यांना अभिवादन केले.
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग व जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त येथील सामाजिक न्याय भवनात सामाजिक न्याय दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जिल्हा जात पडताळणी समितीच्या संशोधन अधिकारी शितल सोनटक्के, महात्मा जोतिबा फुले महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक विठ्ठल नवरु, पोलीस निरीक्षक पवनकुमार चौधरी, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादितचे विभागीय व्यवस्थापक विनायक कदम आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या नांगरासाठी तोफा देणारे राजर्षी शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने महाराजांचे महाराज होते, असे सांगून श्री. सातपुते म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केल्यास त्यांचा विज्ञानवादी दृष्टीकोन प्रकर्षाने जाणवतो. 1920 च्या माणगाव परिषदेत बहिष्कृतांचे पुढारी म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नेतृत्त्व त्यांनी पुढे आणले आहे. आंतरजातीय विवाहाचा कायदा करुन त्याची अंमलबजावणी स्वत:पासून करणारे शाहू महाराज यांच्यासारखे दुसरे उदाहरण जगात सापडणार नाही. अशा शाहू महाराजांचा भक्त होण्यापेक्षा त्यांच्या विचारांवर चालणारे अनुयायी होण्याची खरी गरज आहे.
सहाय्यक आयुक्त श्री. घाटे यांनी स्वागत प्रस्ताविक करुन राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. संविधानाच्या उद्देशिकेचे यावेळी वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत आशिष कांबळे यांनी केले. आभारप्रदर्शन प्राजक्ता मराठे यांनी केले. कार्यक्रमास वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक विजया मोरे, गृहपाल दिपक जाधव, गृहपाल रविंद्र कुमठेकर, निरीक्षक अमोल पाटील, लिपीक संतोष खेडेकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी समतादूत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-

रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज’ जयंती उत्साहात साजरी
रत्नागिरी: रत्नागिरी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आज ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज’ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि फुले वाहून आदरांजली वाहण्यात आली.
या अभिवादन कार्यक्रमाला कार्यालयातील उपस्थित पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचे आणि विचारांचे स्मरण केले. शाहू महाराजांनी समाजातील दुर्बळ घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी केलेल्या योगदानाला यावेळी आदराने नमन करण्यात आले.
-

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून
मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या कालावधीत मुंबईत पार पडणार असल्याची घोषणा विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली.
विधानभवन येथे आयोजित विधानमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा सदस्य दीपक केसरकर, भास्कर जाधव, नितीन राऊत, जितेंद्र आव्हाड, अमीन पटेल, विधानपरिषद सदस्य भाई जगताप, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. -

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे ८५ वर्षीय महिलेचे मरणोत्तर देहदान
रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील खेडशी नाका येथील ८५ वर्षीय श्रीमती विमल शंकर पेडणेकर यांचे आज, गुरुवार दिनांक २६ जून २०२५ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे मरणोत्तर देहदान करण्यात आले. हे या संस्थेतील सातवे देहदान ठरले असून, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
श्रीमती विमल शंकर पेडणेकर यांचे काल, बुधवार दिनांक २५ जून २०२५ रोजी वृद्धापकाळाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी येथील अतिदक्षता विभागात निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या श्रीमती माधवी मधुकर नाखरेकर यांनी एक अत्यंत स्तुत्य निर्णय घेत, आपल्या मातोश्रींच्या देहाचा उपयोग वैद्यकीय विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी आणि संशोधनासाठी व्हावा या उदात्त हेतूने देहदानाचा संकल्प केला.
या देहदान प्रक्रियेवेळी श्रीमती विमल पेडणेकर यांची नात सौ. मंजिरी नाखरेकर, नातजावई आणि सुहास पालेकर, सागर भिंगारे तसेच शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर, शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक श्री. रेशम जाधव, तसेच शरीररचनाशास्त्र विभागातील कर्मचारी पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, मिथिलेश मुरकर आणि मिहिर लोंढे यांनी या संपूर्ण देहदान प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.श्रीमती विमल शंकर पेडणेकर यांच्या या मरणोत्तर देहदानामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवी शरीराचे सखोल ज्ञान मिळण्यास मदत होईल आणि भविष्यातील वैद्यकीय संशोधनासाठीही याचा उपयोग होईल, अशी अपेक्षा आहे. देहदानाच्या या उदात्त कार्यातून पेडणेकर कुटुंबीयांनी समाजात एक आदर्श घालून दिला आहे.
-

फुणगुस खाडीभागात वीज समस्येविरोधात युवा कार्यकर्त्यांची महावितरण कार्यालयावर धडक
सुधारणा न झाल्यास उपोषणाचा इशारा
संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस खाडीभागात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी आणि युवा कार्यकर्त्यांनी गुरुवारी थेट संगमेश्वर येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
फुनगुस गाव आणि परिसरात वीज पुरवठ्यात वारंवार बिघाड होत असून, एकदा वीज गेल्यावर किमान २ ते ४ तास आणि कधीकधी तर दोन-दोन दिवस वीज नसते. याबाबत कार्यालयात विचारणा केल्यास ‘वरुण सप्लाय गेलाय’ असे ठरविक उत्तर दिले जाते, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. एका लाईनमध्ये बिघाड झाल्यास अनेक घरे आणि दुकाने दोन-दोन दिवस अंधारात राहतात, ज्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते.यापूर्वी अनेकदा ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी महावितरणकडे या समस्यांबाबत तक्रारी केल्या होत्या. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वारंवार माहिती देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही, उलट वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. अधिकारी आणि कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेत असल्याने येथील युवा कार्यकर्त्यांनी आता पुढाकार घेतला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष लांजेकर, युवा कार्यकर्ते साहिम खान, परवेज नाईक, अफाक बोदले, ज्येष्ठ शिवसैनिक इकबाल पटेल यांच्यासह ग्रामस्थांनी गुरुवारी संगमेश्वर येथील महावितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता अंकुश कौरवार आणि सहायक अभियंता (शाखा कुंरधुडा संगमेश्वर) नितीन माळी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी फुणगुस गाव आणि परिसरातील विजेच्या समस्यांचा पाढा वाचला आणि लेखी निवेदनही दिले. अधिकाऱ्यांनी समस्या ऐकून घेऊन योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, पुढील महिनाभरात सर्व समस्या निकाली निघून वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी महावितरण कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्याचा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
-

खेड : परशुराम घाटात जेसीबीचा अपघात; चालकावर गुन्हा
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट समाप्त होण्यापूर्वी लोटे बाजूकडील पुलावर १४ जून रोजी सायंकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास एका जेसीबीचा अपघात झाला. या अपघातात जेसीबी चालक गंभीर जखमी झाला असून, वाहनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात २५ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुबोध सखाराम चाळके (वय ३३, रा. पिरलोटे, दत्तवाडी, खेड) यांनी या अपघाताबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कर्नाटक राज्यातील विजापूर येथील रहिवासी प्रकाश भिमाप्पा लमाणी (वय ३२) हे एमएच ०८ एएक्स ०४९९ क्रमांकाचा जेसीबी टेलिस्कोपिक हँडलर चालवत होते. १४ जून रोजी सायंकाळच्या वेळी परशुराम घाटातून बाहेर पडताना लोटे बाजूकडील पुलावर लमाणी यांनी आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने आणि बेजबाबदारपणे चालवले. त्यांच्या निष्काळजीपणामुळे जेसीबी रस्त्याच्या कडेवरील कठड्यावर जाऊन आदळला.
या अपघातात जेसीबी चालक प्रकाश लमाणी यांना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच, जेसीबी टेलिस्कोपिक हँडलरचे स्टिअरिंग, मेन बूम, मोठा टायर आणि दोन काचा यांचे मोठे नुकसान झाले आहे. जेसीबीच्या पुढील भागाचे पूर्णपणे नुकसान झाले असून, यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी खेड पोलीस अधिक तपास करत आहेत. चालकाने योग्य खबरदारी न घेतल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून, वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.