मुंबई: गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी शिवतीर्थ निवासस्थानी भेट देऊन राज ठाकरे यांच्या घरी गणरायाचे दर्शन घेतले होते.
त्यानंतर आता राज ठाकरे यांनीही सपत्नीक वर्षा निवासस्थानी जाऊन फडणवीस यांच्या घरातील गणपती बाप्पांचे दर्शन घेतले.
राज्यात ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाच्या चर्चेला वेग आला असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने होणाऱ्या भेटींनाही राजकीय महत्त्व प्राप्त होत आहे.
यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली. मात्र, चर्चेचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. विशेष म्हणजे, गेल्या 15 दिवसांत ही दोन्ही नेत्यांची तिसरी भेट ठरली आहे.
याआधी 12 जून रोजी वांद्र्यातील ताज लँड्स हॉटेलमध्ये झालेल्या गुप्त भेटीनंतर 21 ऑगस्ट रोजीही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना अचानक भेट दिली होती. त्यावेळी मुंबईतील काही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-मनसे युतीच्या चर्चेला जोर मिळत असताना फडणवीस आणि राज ठाकरेंच्या या वाढत्या गाठीभेटींना विशेष राजकीय महत्त्व प्राप्त होत आहे.
राज ठाकरेंनी सपत्नीक वर्षा निवासस्थानी घेतले गणपतीचे दर्शन
