GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : शिवाजीनगर येथे नगरपरिषदेच्या डंपरची रिक्षाला धडक

Gramin Varta
275 Views

रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील वर्दळीच्या शिवाजीनगर भागात आज दुपारच्या सुमारास नगर परिषदेच्या एका डंपरने मोठा अपघात घडवून आणल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रिलायन्स मॉलच्या बाहेर सिद्धिविनायक नगर परिसरात रिक्षा स्टॅन्डजवळ हा अपघात झाला, ज्यात दोन रिक्षांचे मोठे नुकसान झाले, तसेच डंपरने दोन इलेक्ट्रिक खांबांनाही धडक दिली.

प्राथमिक माहितीनुसार, नगर परिषदेचा हा डंपर साळवी स्टॉपकडून मारुती मंदिराच्या दिशेने जात असताना अचानक त्याचे स्टिअरिंग लॉक झाले, असे बोलले जात आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव डंपर थेट सिद्धिविनायक नगर येथील रिक्षा स्टॅन्डवर घुसला. दुपारची वेळ असल्याने या मार्गावर वाहतूक तशी कमी होती, मात्र रिक्षा स्टॅन्डवर नेहमीप्रमाणे रिक्षा उभ्या होत्या. सुदैवाने, या वेळी केवळ दोनच रिक्षा स्टॅन्डवर होत्या. डंपरच्या जोरदार धडकेत एका रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

रिक्षांना धडक दिल्यानंतरही डंपर थांबला नाही. त्याने पुढे सरकत रस्त्याच्या कडेचे दोन इलेक्ट्रिक खांब तोडले आणि साउथ इंडियन बँकेच्या गेटसमोर जाऊन तो धडकला. या अपघातात जीवितहानी टळली असली तरी, रिक्षाचालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वाहतूक आणि विजेच्या खांबांचे नुकसान झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नगर परिषदेच्या डंपरच्या बेजबाबदारपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

Total Visitor Counter

2656737
Share This Article