मुंबई: मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधन प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी करत हे दोन्ही नेते पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. पुरावे समोर आलेले असताना अद्याप एफआयआर दाखल का करण्यात आलेला नाही, असा संतप्त सवाल त्यांनी पोलिसांना केला.
या प्रकरणात डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदारांनी केली. डीजीसीएच्या अहवालात व्हीएसआर कंपनीचा निष्काळजीपणा स्पष्टपणे नमूद करण्यात आला असून, विमानाच्या देखभालीत गंभीर त्रुटी होत्या, असा दावा आमदारांनी केला. केवळ चौकशी सुरू असल्याचे सांगून वेळकाढूपणा करू नये, तर तात्काळ गुन्हा नोंदवून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असा दबाव त्यांनी पोलिसांवर टाकला.
पोलीस ठाण्यातील केबिनमध्ये रोहित पवार, अमोल मिटकरी, संदीप क्षीरसागर आणि त्यांचे वकील उपस्थित होते. बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना केबिनबाहेर काढण्यात आले. दरम्यान, पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढे तातडीने पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी आमदारांशी चर्चा करत योग्य ती कारवाई कायद्याच्या चौकटीत केली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, केवळ आश्वासन नको, तात्काळ एफआयआर दाखल करा, या मागणीवरून आमदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
रोहित पवार यांनी पोलिसांना धारेवर धरत, “राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपघातात मृत्यू होतो, आमच्याकडे घातपाताचे ठोस पुरावे आहेत, तरीही गुन्हा का दाखल होत नाही?” असा थेट सवाल केला. विमान कंपनीला वाचवण्यासाठी पोलीस दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अमोल मिटकरी यांनीही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एवढ्या मोठ्या घटनेनंतरही तत्काळ कारवाई होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
या संपूर्ण घटनेमुळे मरीन ड्राईव्ह परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





