मुंबई: मी प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही, पण प्रगती ही मराठी माणसाच्या थडग्यावर टाकून होत असेल तर मी खपवून घेणार नाही. भाजपला मतदान करणारे मराठी लोक आहेत. मला त्यांना सांगायचे आहे की, हा गुजरातचा वरवंठा महाराष्ट्रावर फिरेल ना तेव्हा तुम्हालाही त्या खाली घेतले जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.
मुंबईत आयोजित मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुख मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाकरे पुढे म्हणाले, मी बुलेट ट्रेनला विरोध केला होता तो पट्टा बघा, भौगोलिक पट्टा आहे बघा. तिथे आता नवे विमानतळ तयार करतील, सांताक्रुझचे विमानतळ आहे, तेथील सगळे ऑपरेशन कमी करणार आणि ते नवी मुंबईला नेणार. इथले सगळे कार्गो काढणार आणि वाढवणला नेणार आणि मग सगळी जमीन अदानीच्या घशात घालणार. सगळ्या गोष्टीत अदानीच, रस्ते, बोगदे सगळीकडे तेच आहे. आता नॅशनल पार्कचे जंगल तोडणार आणि प्रकल्प टाकणार, आदिवासींना हटविणार. असा इशारा देखील राज ठाकरेंनी दिलाय. मुंबईतील हे कोस्टल रोड तुमच्यासाठी नाहीत, आमचेच शेण खात आहेत, आमचीच मराठी माणसे यांना जमिनी देत आहेत. आमचीच मराठी माणसे दलाल म्हणून यांना जमिनी देत आहेत. केंद्र हातात आहे, राज्य आहे, उद्या पालिका आणि परिषदा गेल्या ना की रान मोकळेच होईल.
जमीन एकदा हातातून गेली की ती परत येत नाही. जमीन हेच तुमचं अस्तित्त्व आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांना माझी विनंती आहे सतर्क राहा. यादी प्रमुखांना मी बोलवलंय. सगळ्यांना माझी विनंती आहे की आमचे लोक येतील आणि इतर पक्षांचे लोक येतील त्यांना सहकार्य करा. एक एक घरात आठशे माणसं, सातशे माणसं भरली जात आहेत. जे मतदार नाहीत त्यांची खोटी नावं भरुन निवडणुकांना सामोरं जायचं म्हणत आहेत. हे जोपर्यंत मतदार याद्या पूर्णपणे स्वच्छ होत नाही. सगळ्या पक्षांचं समाधान होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा. महाराष्ट्रातल्या निवडणुका सन्मानाने आणि शांततेत पार पाडायच्या असतील तर याद्यांचा घोळ मिटवा. जे मतदान होईल ते खरं होईल या दृष्टीकोनातून निवडणुका झाल्या पाहिजेत, असं राज ठाकरे म्हणाले.
यंदा विधानसभा निवडणुकीत महायुतीचे 232 आमदार निवडून आले. इतकं प्रचंड यश मिळूनही महाराष्ट्रात प्रचंड सन्नाटा होता. कुठेही विजयी मिरवणुका काढण्यात आल्या नाहीत, जल्लोष झाला नाही. मतदारही हा निकाल पाहून अवाक झाले. निवडून आलेल्यांना कळलं नाही, आपण कसे निवडून आलो. मतदार याद्यात बोगस मतदार घुसवून सत्ताधारी स्थानिक पक्षांना संपवत आहेत. जोपर्यंत महाराष्ट्रातील मतदार याद्या साफ होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊनच दाखवा, असे आव्हानही ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिले.