संगमेश्वर: संगमेश्वर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून गंभीर जखमी झालेल्या एका ३५ वर्षीय प्रवाशाचा रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी जखमी अवस्थेत मिळून आलेल्या या प्रवाशाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले होते, परंतु त्याला वाचवण्यात यश आले नाही.
या घटनेची नोंद सिव्हील हॉस्पिटल, रत्नागिरी येथे करण्यात आली आहे. मृत प्रवाशाचे नाव अस्लम कासीम अली (वय ३५, रा. श्रीराम कॉलनी, करावलनगर, नॉर्थ ईस्ट दिल्ली) असे आहे. ही घटना २१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६.२१ वाजण्यापूर्वी संगमेश्वर रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे ट्रॅकवर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली येथील रहिवासी असलेला अस्लम कासीम अली हा प्रवासादरम्यान रेल्वेतून खाली पडून गंभीर जखमी झाला होता. रेल्वे ट्रॅकजवळ तो जखमी अवस्थेत रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळून आला. कर्मचाऱ्यांनी त्याला तत्काळ उपचारासाठी संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले.
ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर, अस्लम अली यांना अधिक उपचारांसाठी १०८ रुग्णवाहिकेने रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्यांना रात्री ८.०० वाजता सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच, रात्री ८.४० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
सिव्हील हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रेयश माईन यांनी अस्लम कासीम अली यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद करण्यात आली असून, संगमेश्वर पोलीस ठाणे या अपघाती मृत्यूच्या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.






