GRAMIN SEARCH BANNER

गणपतीपुळे समुद्रात पोहताना पुणेकर तरुणाचा बुडून मृत्यू; मालगुंड किनाऱ्यावर आढळला मृतदेह

Gramin Varta
376 Views

रत्नागिरी: गणपतीपुळे येथील समुद्रात पोहत असताना खोल पाण्यात ओढले गेल्याने एका १८ वर्षीय पुणेकर तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी मालगुंड येथील समुद्रकिनाऱ्यावर आढळून आला.

जयगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील केशवनगर, मुंडवा येथे राहणारा निखिल शिवाजी वाघमारे (वय १८) हा तरुण २४ ऑक्टोबर २०२५ रोजी गणपतीपुळे येथे आला होता. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तो गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी उतरला होता.

पोहत असतानाच समुद्रात आलेल्या एका मोठ्या लाटेमुळे निखिल वाघमारे खोल पाण्यात ओढला गेला आणि बेपत्ता झाला. त्याच्या शोधासाठी प्रयत्न सुरू असताना, दुसऱ्या दिवशी म्हणजेच २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह मालगुंड येथील सागर दर्शन रिसॉर्टच्या पाठीमागील समुद्रकिनाऱ्यावर बेशुद्ध अवस्थेत मिळून आला.

स्थानिकांनी तातडीने निखिलला उपचारासाठी वाटद-खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

या घटनेनंतर जयगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ३३/२०२५ अन्वये नोंद करण्यात आली आहे. भारतीय न्यायसंहिता अधिनियम (BNSS) १९४ प्रमाणे ही घटना नोंदवून पुढील तपास जयगड पोलीस करत आहेत. गणपतीपुळे समुद्रात पोहताना योग्य खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Total Visitor Counter

3072293
Share This Article