GRAMIN SEARCH BANNER

भरणे पतसंस्था अपहार प्रकरणातील आणखी दोन महिला संचालकांना अटक

Gramin Varta
230 Views

खेड : तालुक्यातील भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणी शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या दोन महिला संचालकांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या अटकेमुळे पतसंस्थेतील अपहार प्रकरणात सध्या कोठडीत असलेल्या आरोपींची संख्या एकूण सहा झाली आहे.

पतसंस्थेच्या वैधानिक लेखापरीक्षणात तब्बल ₹४ कोटी २२ लाख ८१ हजार २१ रुपयांचा मोठा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. या गंभीर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या महिला संचालकांची नावे तेजा राजाराम बैकर व रेवती चंद्रकांत खातू अशी आहेत. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, यामुळे या अपहाराच्या तपासाला आणखी गती मिळणार आहे. गुंतवणूकदारांच्या वतीने सरकारी वकील मेघना नलावडे यांनी न्यायालयात बाजू मांडली.
यापूर्वी संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम बैकर, उपाध्यक्ष सुधाकर शिंदे, माजी उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिया सुतार, तसेच सदस्य सुभाष शिंदे या पाच जणांना अटक करण्यात आली होती. यापैकी माजी उपाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा जामीन अर्ज मंजूर झाला आहे, तर उपाध्यक्ष सुधाकर शिंदे आणि सदस्य सुभाष शिंदे यांचे जामीन अर्ज नामंजूर झाले आहेत. त्यामुळे आता अटक झालेल्या दोन महिला संचालकांसह एकूण सहा संचालक सध्या पोलीस कोठडीत आहेत. या मोठ्या अपहारप्रकरणी इतर काही संचालक आणि कर्मचारी यांच्यावर देखील अटकेची टांगती तलवार कायम आहे. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास सुरू असून, घोटाळ्याची पाळेमुळे आणखी खोलवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3199399
Share This Article