GRAMIN SEARCH BANNER

खेडशी डफळवाडी येथे बिबट्याची दहशत! सीसीटीव्हीमध्ये कैद

Gramin Varta
347 Views

रत्नागिरी:- रत्नागिरी जवळच्या खेडशी डफळवाडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वन्यप्राण्यांची दहशत वाढली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करणाऱ्या गवा रेड्यांचा प्रश्न अजून सुटलेला नसतानाच, आता चक्क पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याची भर पडली आहे. मंगळवार, दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ च्या पहाटे १.४५ वाजता हा बिबट्या एका नागरिकाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, त्याने अंगणात झोपलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाला भक्ष्य बनवले आहे. यामुळे आधीच भयभीत असलेल्या ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

डफळ चोळ वाडीतील रहिवासी श्री. चंद्रकांत होरंबे यांच्या घराच्या अंगणातील सीसीटीव्ही कॅमेरात पहाटेच्या वेळी बिबट्या स्पष्टपणे कैद झाला आहे. गवा रेड्यांच्या सततच्या उपद्रवामुळे शेतीचे नुकसान होत असताना, वनविभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यातच आता या बिबट्याच्या संचारामुळे येथील नागरिकांची झोप उडाली आहे.

डफळ चोळ वाडीतील अनेक तरुण एमआयडीसी परिसरात कामाला आहेत. त्यांची दुसरी शिफ्ट (सेकंड शिफ्ट) सुटण्याची वेळ ही मध्यरात्रीची असते. अशा वेळी बिबट्या आणि गवा रेड्यांचा मुक्त संचार पाहता, हे तरुण रोज जीव मुठीत घेऊन घरी परतत आहेत. या वन्यप्राण्यांमुळे रात्री-अपरात्री बाहेर पडणे नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक बनले आहे.

गवा रेड्यांनी केलेले नुकसान आणि त्यांची दहशत अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे, मात्र वनविभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा सूर ग्रामस्थांमध्ये आहे. आता बिबट्याच्या थेट वस्तीत येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ले करण्याच्या घटनेनंतरही वनविभाग आवश्यक उपाययोजना करणार नाही का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

ग्रामस्थांनी तातडीने संबंधित वनविभागाने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा आणि गव्यांच्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी त्यांची मागणी आहे. या घटनेमुळे डफळवाडीमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, वनविभागाच्या प्रतीक्षेत सारे गाव दहशतीच्या सावटाखाली आहे.

Total Visitor Counter

3073053
Share This Article