GRAMIN SEARCH BANNER

ग्रामीण वार्ताची दखल : आमदार किरण सामंत यांनी केली लांजा श्रीराम पुलाजवळ पाहणी

Gramin Varta
689 Views

संबंधित ठेकेदाराला दिल्या पाणी आणि चिखल साफ करण्याच्या सूचना

लांजा: अवकाळी पावसाने लांजा बाजारपेठेत मोठा हाहाकार माजवला असून, ब्रिटिशकालीन रामपूलजवळ राष्ट्रीय महामार्गाचे सुरू असलेले काम आणि त्यातील ठेकेदाराच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे आज पहाटे रहिवाशांच्या घरात चक्क पावसाचे पाणी शिरले. यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, जीवन विस्कळीत झाले आहे.

‘ग्रामीण वार्ता’ने सकाळी ८.५५ वाजता या गंभीर समस्येची बातमी प्रसिद्ध होताच, लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांना तातडीने याची माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार सामंत यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ लांजा बाजारपेठ येथील घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पूरग्रस्त भागाची आणि नागरिकांच्या घरांची पाहणी केली व परिस्थितीचा आढावा घेतला.

महामार्गाच्या कामामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडल्याने आणि आवश्यक उपाययोजना न केल्यामुळेच रहिवाशांच्या घरात पाणी घुसल्याचे यावेळी स्पष्ट झाले. आमदार सामंत यांनी तत्काळ संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सूचना दिल्या. ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे, त्यांचे झालेले नुकसान भरून द्यावे, तसेच पाण्यामुळे घरांमध्ये झालेला चिखल आणि घाण त्वरित साफ करून देण्याचे निर्देश त्यांनी ठेकेदाराला दिले आहेत.

आमदार सामंत यांच्या तात्काळ पाहणी दौऱ्यामुळे संतप्त नागरिकांना दिलासा मिळाला असून, महामार्गाच्या कामातील निष्काळजीपणाबाबत आता मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी तातडीने योग्य ड्रेनेज व्यवस्था उभारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Total Visitor Counter

3342879
Share This Article