रत्नागिरी (प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपालिका निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून, ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होईल. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. प्रशासकांच्या अखत्यारीत असलेला कारभार तब्बल चार वर्षांनी पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या हातात येणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांची एकच तारांबळ उडाली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राज्यातील एकूण २८८ (२४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायती) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता हा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. ४ नोव्हेंबर २०२५ पासून या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. अवघ्या महिन्याभराच्या कालावधीत निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे.
कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत, त्यात रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि राजापूर या चार नगरपालिकांचा समावेश आहे. तसेच, गुहागर, देवरुख आणि लांजा या तीन नगरपंचायतींसाठी निवडणुका घोषित झाल्या आहेत.
जिल्ह्यातील मतदार आणि मतदान केंद्रांची स्थिती
जिल्ह्यात एकूण १०१ प्रभागांमध्ये २०० मतदान केंद्रांवर सुमारे १ लाख ६० हजार ४४८ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ८२ हजार ५६२ महिला मतदार, ७७ हजार ८८५ पुरुष मतदार आणि एक इतर मतदार यांचा समावेश आहे. मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून सुरू होईल आणि निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
नगरपालिका आणि नगरपंचायतीनिहाय मतदारांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:







