मुंबई : मुंबई-रत्नागिरी प्रवास तीन तासात, तर मुंबई-विजयदुर्ग, सिंधुदुर्ग प्रवास पाच तासात करता यावा यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई – विजयदुर्ग दरम्यान रो रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
यासाठी तयारीही पूर्ण केली. आधी गणेशोत्सवादरम्यान आणि गणेशोत्सवानंतर ही सेवा सुरू करण्याचेही मंडळाने जाहीर केले. मात्र आता दिवाळी संपली तरी मुंबई-विजयदुर्ग रो रो सेवेसाठी मुहूर्त सापडलेला नाही. या सेवेची प्रवाशांना अद्यापही प्रतीक्षाच आहे. रो रो सेवा उपलब्ध करणाऱ्या कंपनीकडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे रो रो सेवा रखडल्याचे समजते.
मुंबईवसिंधुदुर्ग दरम्यानचा प्रवास रस्ते मार्गे करण्यासाठी १० तासांहून अधिकचा वेळ लागतो. तर रेल्वे आणि एसटीने बराच वेळ लागतो. गणेशोत्सवात मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असते आणि यावेळी कोकणात जाणाऱ्यांना बरीच कसरत करावी लागते. त्यात मुंबई – गोवा महामार्गाचे काम रखडल्याने प्रवाशांच्या गैरसोयीत आणखी वाढ होताना दिसते. या पार्श्वभूमीवर मुंबई – कोकण प्रवास अतिजलद करण्यासाठी सागरी मंडळाने मुंबई – विजयदुर्ग दरम्यान रो रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यादृष्टीने आवश्यक ती कामे हाती घेण्यात आली. विजयदुर्ग येथील प्रवासी जेट्टीचे रो रो जेट्टीत रुपांतर करून आवश्यक त्या चाचण्याही घेण्यात आल्या. तर भाऊचा धक्का येथेही रो रोच्या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा विकसित करण्यात आल्या. सागरी मंडळाने १४० हून अधिक विविध प्रकारच्या परवानग्या घेतल्या. तर ही सेवा गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन तीन दिवस आधी सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र हा मुहूर्त चुकला, त्यानंतर १ सप्टेंबरला रो रो सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले, मात्र यावेळीही रो रो सुरू झाली नाही आणि प्रवाशांचे मुंबई, रत्नागिरी प्रवास तीन तासात, तर मुंबई – विजयदुर्ग प्रवास पाच तासात करण्याचे स्वप्न भंगले.
रो रो सेवा कार्यान्वित करणाऱ्या कंपनीकडून काही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, असे रो रो सेवेबाबत विचारणा केली असता महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी यांना सांगितले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सागरी मंडळाकडून रो रो सेवा सुरू करण्याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येईल. असे प्रदीप पी यांनी सांगितले. मात्र ही सेवा नक्की केव्हा सुरू होणार याचे उत्तर सागरी मंडळाकडून मिळाले नाही. त्यामुळे मुंबई – तळकोकण प्रवास पाच तासात करण्यासाठी प्रवाशांना आणखी किती वेळ वाट पाहावी लागणार हा प्रश्नच आहे.
मुंबई – कोकण प्रवास पाच तासांत करण्याच्या स्वप्नपूर्तीत अपुऱ्या प्रक्रियेचा अडथळा, मुंबई – विजयदुर्ग रो रो सेवेची प्रतीक्षा संपेना






