रत्नागिरी : श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे स्वयंभू श्री मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या नित्यनैमित्तिक दीपोत्सवाची सांगता बुधवारी (ता. ५) त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर मंगलमय वातावरणात संपन्न झाली. तालुक्याचे भूषण असलेल्या या मंदिरात कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमा या कालावधीत दररोज सायंकाळी दीपोत्सव साजरा होतो.
श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री लंबोदरच्या मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून ही धार्मिक परंपरा जोपासली जात आहे. यावर्षीही नित्यनेमाने सायंकाळी होणाऱ्या या दीपोत्सवाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला भरगच्च उपस्थितीत झाली. सांगता सोहळ्यानिमित्त श्रींच्या गाभाऱ्यासह मुख्य मंदिर, मंदिर परिसर तसेच प्रदक्षिणा मार्गावरील ‘मोरया’ या स्थानावरील त्रिपुरांची परंपरेनुसार विधीवत पूजाअर्चा करण्यात आली. असंख्य तेलवातीच्या दिव्यांनी, पणत्यांनी व समयांच्या साहाय्याने संपूर्ण मंदिर परिसर तेजाळला होता. यानंतर सायंकाळी सात ते साडेसात या वेळेत भाविकांनी श्रींच्या सामूहिक आरतीत व मंत्रपुष्पांजली प्रार्थनेत सहभाग घेतला.






