GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण : जंगलातून अचानक गवा रेडा एस.टी. बसच्या दिशेने धावला; चालकाची उडाली भंबेरी, तरीही…

Gramin Varta
1.2k Views

चिपळूण : चिपळूण आगाराची तळवडे मार्गावर धावणारी एस.टी. बस रविवारी सकाळी थरारक प्रसंगातून सुखरूप बाहेर पडली. जंगलमय रस्त्यावरून जात असताना अचानक एका चवताळलेल्या रानगव्याने डोंगरावरून सुसाट बसच्या दिशेने धाव घेतली. चालकाची भंबेरी उडाली तरीही न घाबरता चालक एस.एस. सुर्वे यांनी बस वेगाने पुढे नेल्याने मोठा अपघात टळला.

ही घटना रविवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. बसमध्ये २७ प्रवासी होते. गवा बसकडे झेपावत असल्याचे दिसताच काही क्षण प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र चालकाच्या चातुर्यामुळे सर्व प्रवासी सुरक्षित बचावले.

गेल्या काही महिन्यांपासून या परिसरातील घनदाट जंगलात वास्तव्यास असलेले जंगली प्राणी मानवी वस्त्यांकडे येऊ लागले आहेत. रानगव्यांच्या हल्ल्यांमुळे अनेकदा ग्रामस्थ जखमी झाले असून काहींचा जीवही गेला आहे. त्यामुळे या भागातून प्रवास करताना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तळवडे–सहाण या भागातील जंगलरस्त्यावरून ही बस नियमितपणे धावत असते. त्या दिवशी सुर्वे चालक आणि एस.एस. आंब्रे वाहक म्हणून कार्यरत होते. बस माळरानाजवळ पोहोचताच गवा अचानक डोंगरावरून धावत आला. बसचा आवाज ऐकताच तो अधिक चवताळला आणि थेट बसकडे झेपावला.

परिस्थितीची जाणीव होताच चालकाने तत्परतेने बसचा वेग वाढवला. काही सेकंदात बस पुढे गेल्याने गवा थांबला आणि परत डोंगराच्या दिशेने पळाला. प्रवाशांनी या रोमांचक प्रसंगाचे चित्रीकरण मोबाईलमध्ये करून ठेवले आहे.

Total Visitor Counter

3198784
Share This Article