GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी आरटीओ कार्यालयाचे स्वच्छतेसाठी राज्यात पहिले स्थान

Gramin Varta
103 Views

रत्नागिरी : रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि आधुनिक व्यवस्थापन हे राज्यातील इतर आरटीओ कार्यालयांसाठी आदर्श ठरत आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘१०० दिवस कार्यक्रमात’ रत्नागिरी आरटीओ कार्यालयाने राज्यात पहिला क्रमांक मिळवला असून, या कार्यालयाला ‘आयएसओ मानांकन’ देण्याची मागणी सेवानिवृत्त परिवहन अधिकाऱ्यांनी केली आहे.

राज्यातील वीस सेवानिवृत्त परिवहन आयुक्त आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी रत्नागिरी आरटीओ कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. महाराष्ट्रात पहिले पारितोषिक मिळवलेल्या या कार्यालयाच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी हे अधिकारी रत्नागिरीत आले होते. त्यांच्या स्वागताचे आयोजन आरटीओ राजवर्धन करपे आणि सहाय्यक आरटीओ अजित ताम्हणकर यांनी केले.

या वेळी सेवानिवृत्त परिवहन आयुक्त दिलीप जाधव, अपर आयुक्त शिरीष ठाकूर, सतीश सहस्रबुध्दे, प्रसाद महाजन, एल.पी. खाडे, एस.के. पाचरणे, अमरेंद्र पाठक, जितेंद्र पाटील, संजय राऊत, प्रकाश जाधव, विलास कांबळे, अशोक शिंदे, सुबोध मेडसीकर, योगेश बाग, कमलेश चव्हाण, सतीश साळवी, रुक्मणीकांत कळमणकर, राजेंद्र झेंडे, चंद्रकांत जवळकर, मारुती पाटील आणि मोहन जाधव आदी उपस्थित होते.

पूर्वीच्या काळात आरटीओ कार्यालयात मर्यादित सुविधा होत्या. परंतु आता अत्याधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि पारदर्शक प्रणाली असलेले हे कार्यालय उभे राहिले आहे. केवळ सजावट नव्हे, तर कामकाजातही कार्यक्षमता दिसून येते. दस्तऐवज व्यवस्थापन, ऑनलाईन रेकॉर्ड्स आणि नागरिकसेवेतील तत्परता हे या कार्यालयाचे वैशिष्ट्य असल्याचे सेवानिवृत्त परिवहन आयुक्त दिलीप जाधव यांनी नमूद केले.

भेट देणाऱ्या समितीचे स्वागत मोटार ट्रेनिंग प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले. प्रास्ताविक आरटीओ राजवर्धन करपे यांनी केले, तर आभारप्रदर्शन सहाय्यक आरटीओ अजित ताम्हणकर यांनी केले.

Total Visitor Counter

3199402
Share This Article