मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे बंधनकारक केल्यानंतर राज्य सरकारने टीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार २३ नाेव्हेंबर रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल ४ लाख ७५ हजार ६६८ उमेदवारांनी अर्ज केले असून राज्यातील १ हजार ४२० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
राज्य सरकार २३ नोव्हेंबर रोजी घेत असलेल्या टीईटी परीक्षेला गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक शिक्षकांनी अर्ज केले आहेत. राज्यामध्ये झालेल्या नोंदणीमध्ये ४ लाख ७५ हजार ६६८ उमेदवारांनी अर्ज केले असून, पुण्यामधून सर्वाधिक ३७ हजार २९३ शिक्षकांनी अर्ज केले आहेत. त्याखालोखाल नाशिकमधून ३२ हजार ३१ आणि नांदेडमधून २६ हजार १३७ उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
मुंबई शहरातील तीन विभागांमधून एकूण १२ हजार ६५० उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यामध्ये मुंबई दक्षिण विभागातून ३ हजार ५०७, मुंबई पश्चिम विभागातून ४ हजार ९८१ आणि मुंबई उत्तर विभागातून ४ हजार १६२ शिक्षकांनी अर्ज केले आहेत. ठाण्यातून १६ हजार ९१४ शिक्षकांनी अर्ज केले आहेत.
टीईटी परीक्षेचे दोन पेपर असून, पेपर १ साठी २ लाख ०३ हजार ३३३, तर पेपर २ साठी २ लाख ७२ हजार ३३५ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा राज्यातील १ हजार ४२० परीक्षा केंद्रांवर होणार असून, पेपर १ साठी ५६९ आणि पेपर २ साठी ८५१ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पेपर १ मधील गणित विषयाची परीक्षा १ लाख ०१ हजार ७९४ उमेदवार, तर समाजशास्त्र या विषयाची परीक्षा १ लाख ७० हजार ५४१ उमेदवार देणार आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असून त्यात अहमदनगर (२२ हजार ८५०), छत्रपती संभाजीनगर (२४ हजार २००), लातूर (२१ हजार ७४४) आणि सोलापूरचा (२१ हजार ३०५) सहभाग आहे.
राज्यस्तरावर केंद्रीकृत केलेल्या तयारीनुसार रविवारीची परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केल्या असून येत्या काही दिवसांत केंद्रनिहाय सूचना जाहीर करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.







