GRAMIN SEARCH BANNER

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एक्सप्रेसवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला; तिकीट निरीक्षकांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

Gramin Varta
597 Views

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या ओखा – एरणाकुलम एक्सप्रेसवर दरोडा टाकण्याचा मोठा कट तिकीट निरीक्षकांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला आहे. शनिवारी मध्यरात्री खेड नजीकच्या विन्हेरे रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला. गाडीतील तिकीट निरीक्षक महेश पेंडसे आणि आर. सी. मीना यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांची मोठी लूट आणि अनर्थ टळला असून, या दोन्ही कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शनिवारी पनवेल येथून सुटलेली गाडी क्रमांक १६३३७ ओखा – एरणाकुलम एक्सप्रेस विन्हेरे स्थानकावर क्रॉसिंगसाठी थांबली होती. रविवारची पहाट असल्याने बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. रात्री दोन ते अडीचच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत ७ ते ८ दरोडेखोरांच्या टोळीने गाडीच्या एस-१ आणि एस-२ या बोगींकडे धाव घेतली. दरोडेखोरांनी ओळख लपवण्यासाठी तोंडाला काळे कपडे बांधले होते आणि अंगातही काळ्या रंगाचेच कपडे परिधान केले होते. साधारण ३० ते ४० वयोगटातील हे तरुण दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाच ड्युटीवर तैनात असलेले तिकीट निरीक्षक महेश पेंडसे आणि आर. सी. मीना यांच्या हा संशयास्पद प्रकार लक्षात आला.

संभाव्य धोका ओळखताच या दोन्ही तिकीट निरीक्षकांनी क्षणाचाही विलंब न करता तत्परता दाखवली. त्यांनी त्वरित बोगीतील प्रवाशांना जागे करून खिडक्या आणि दरवाजे बंद करण्यास सांगितले. आतून प्रवाशांची हालचाल आणि सतर्कता पाहताच दरोडेखोरांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला. यापूर्वीही याच परिसरात अशाच पद्धतीने रात्रीच्या वेळी गाड्या लुटण्याचे प्रकार घडले होते, मात्र यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जागरूकतेमुळे दरोडेखोरांचा हा प्रयत्न सपशेल फसला.

या थरारक घटनेनंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला असून, आपल्या जीवाची आणि सामानाची रक्षा केल्याबद्दल महेश पेंडसे आणि आर. सी. मीना यांचे विशेष आभार मानले आहेत. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना महेश पेंडसे यांनी प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना गाडी स्थानकावरून सुटली की खिडक्या आणि दरवाजे सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करून घ्यावेत व प्रवाशांनी योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Total Visitor Counter

3073098
Share This Article