मंडणगड: शहरालगत असलेल्या बाणकोट मार्गावरील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चोरट्याने घरातून रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ९१ हजार ९० रुपयांचा ऐवज चोरून नेला असून, याप्रकरणी साईनगर येथील एका २२ वर्षीय तरुणावर मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुमाना सिकंदर ओंबिलकर (वय ३५, रा. रुम नं. ३०३, गॅलेक्सी अपार्टमेंट, बाणकोट रोड, मंडणगड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ही घटना १६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २.०० ते ३.०० या वेळेत घडली. फिर्यादी रुमाना ऑबिलकर या काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. यावेळी घर बंद असल्याचे पाहून चोरट्याने संधी साधली आणि प्लॅटच्या समोरील मुख्य दरवाजाचे कुलूप कोणत्यातरी हत्याराने उचकटून घरात प्रवेश केला.
या घरफोडीत चोरट्याने घरातील ४ हजार रुपयांची रोख रक्कम, ८ हजार ७१० रुपये किमतीचे ८७ ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण आणि ७८ हजार ३८० रुपये किमतीचे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ९१ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चोरीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर ओंबिलकर यांनी पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीवरून संशयित आरोपी कुणाल सुबोध लिडकर (वय २२, रा. साईनगर, मंडणगड) याच्या विरोधात १८ डिसेंबर रोजी रात्री उशिरा भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.






