GRAMIN SEARCH BANNER

कडवई गाव उजळणार हजारो सौर पथदीपांनी; ग्रामस्थांनी जमा केली लाखोंची लोकवर्गणी

Gramin Varta
428 Views

कडवई : संगमेश्वर तालुक्यातील कडवई ग्रामपंचायतीने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना’त सक्रिय सहभाग नोंदवला असून, हे अभियान यशस्वी करण्यासाठी आणि गावाला स्पर्धेत अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले आहे. गावातील वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी गावातील हजारो पथदीप सौरऊर्जेवर चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. विशेष म्हणजे, यासाठी सरकारी निधीची वाट न पाहता ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे लाखोंची लोकवर्गणी जमा करण्यास सुरुवात केली आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, गटविकासाधिकारी आनंद कोकरे व सहायक गटविकासाधिकारी विनोदकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास अधिकारी राहुलकुमार चौधरी, सरपंच विशाखा कुवळेकर, उपसरपंच दत्ताराम ओकटे, माजी सरपंच वसंत उजगावकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य हे अभियान यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. नुकत्याच झालेल्या गावबैठकीत गावात सुशासन निर्माण व्हावे आणि गाव समृद्ध व्हावे, यासाठी चर्चा करण्यात आली. गावातील सध्या महावितरणच्या १६ वीज मीटरवर पथदीप सुरू आहेत. विजेचे बिल वाचवण्यासाठी हे सर्वच्या सर्व दिवे सौरऊर्जेवर रूपांतरीत करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून कडवई बाजारपेठ परिसरातील ४५० पथदीप असलेला मीटर सौरऊर्जेवर करण्याच्या कामाला तात्काळ सुरुवात करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. कडवई मोहल्ला येथील ग्रामस्थांनी एकत्रितपणे तब्बल दोन लाख रुपये, तर उजगावकर वाडीतील ग्रामस्थांनी सव्वीस हजार रुपयांची लोकवर्गणी जमा करून ती चेअरमन सिकंदर जुवळे, सादिक काझी व मुस्ताक सावंत यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केली.

याच बैठकीत घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर कर शंभर टक्के भरून ग्रामनिधी बळकट करण्याचा एकमुखी निर्णयही घेण्यात आला. सौर प्रकल्पामुळे गावाची विजेच्या खर्चात मोठी बचत होणार असून, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ग्रामस्थांना होणारा त्रासही वाचणार आहे. गावची स्वच्छता आणि समृद्धी याला प्राधान्य देऊन या स्पर्धेत यश मिळवण्यासाठी कडवईकर आता सज्ज झाले आहेत.

Total Visitor Counter

3291213
Share This Article