GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर स्थानकात दोन लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसचा थांबा; लढ्याला अखेर यश

Gramin Varta
561 Views

संगमेश्वर : तालुक्यातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून पोरबंदर–कोचीवेली सुपरफास्ट एक्स्प्रेस (20910/20909) आणि जामनगर–तिरुनलवेली एक्स्प्रेस (19577/19578) या दोन्ही लांब पल्ल्याच्या गाड्यांना संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाने दिलेल्या या मान्यतेमुळे संगमेश्वर व परिसरातील हजारो प्रवाशांची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ‘निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर (रेल्वे) ग्रुप’च्या माध्यमातून या गाड्यांना संगमेश्वर रोड येथे थांबा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात होता. पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेटी, आंदोलन, उपोषण अशा विविध मार्गांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. अखेर या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश येत रेल्वे बोर्डाने थांब्याला हिरवा कंदील दिला आहे.

या निर्णयासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे बोर्ड, कोकण रेल्वे प्रशासन, खासदार नारायण राणे, आमदार शेखर निकम तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सहकार्याबद्दल ग्रुपच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच या लढ्यात खंबीरपणे साथ देणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील सामान्य रेल्वे प्रवासी, नागरिक आणि हितचिंतकांचेही आभार मानण्यात आले आहेत.
संघटनेचे प्रमुख संदेश जिमन व त्यांच्या सहकाऱ्यांचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे. तीन वर्षांपूर्वी नेत्रावती एक्स्प्रेसला थांबा मिळवून दिल्यानंतर आता आणखी दोन महत्त्वाच्या गाड्यांचा प्रश्न मार्गी लागल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या आनंदाच्या पार्श्वभूमीवर येत्या २६ डिसेंबर २०२५ रोजी संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात भव्य स्वागत व जल्लोषाचे आयोजन करण्यात येणार असून, त्याची सविस्तर रूपरेषा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.

Total Visitor Counter

3253173
Share This Article