रत्नागिरी: रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उक्षी शाळेच्या विद्यार्थिनीने देदीप्यमान यश संपादन केले आहे. जिल्हा परिषद शाळा उक्षी नंबर १ ची विद्यार्थिनी कुमारी रुकसार वसीम राजापकर हिने थाळीफेक स्पर्धेत संपूर्ण तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला असून, तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाने उक्षी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
बुधवारी, २४ डिसेंबर रोजी रत्नागिरी पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यातील लहान गटाच्या थाळीफेक प्रकारात रुकसार राजापकर हिने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. आपल्या अचूक फेक आणि कौशल्याच्या जोरावर तिने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रथम क्रमांक मिळवला. आता ती जिल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत रत्नागिरी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
रुकसारला हे यश मिळवून देण्यात तिची आई सौ. आसिफा राजापकर आणि वर्गशिक्षक श्री. राजेश भंडारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल उक्षी नंबर १ शाळेची व्यवस्थापन समिती, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद आणि उक्षी ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले आहे. तसेच जिल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.






