राजापूर / प्रतिनिधी: कोकणातील शैक्षणिक क्षेत्रात राजापूर शहराने नेहमीच आपली वेगळी ओळख जपली आहे. याच परंपरेत आता आणखी एका मानाच्या तुऱ्याची भर पडली आहे. राजापूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक माजीद पाटणकर यांचे सुपुत्र दानिश माजीद पाटणकर यांनी चार्टर्ड अकाऊंटंट (CA) ही अत्यंत कठीण समजली जाणारी परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून राजापूरच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. विशेष अभिमानाची बाब म्हणजे राजापूर शहरातून ही प्रतिष्ठेची पदवी प्राप्त करणारे दानिश पाटणकर हे पहिले मुस्लिम सीए ठरले असून, त्यांच्या या ऐतिहासिक यशाने संपूर्ण राजापूर शहरासह जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत आहे.
नुकताच मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या वतीने भव्य दीक्षांत समारंभ पार पडला. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते दानिश पाटणकर यांना अधिकृतपणे सीए पदवी प्रदान करण्यात आली. सीए अभ्यासक्रम हा देशातील सर्वात आव्हानात्मक आणि कठीण अभ्यासक्रमांपैकी एक मानला जातो. यासाठी प्रचंड एकाग्रता आणि सातत्याची आवश्यकता असते. दानिश यांनी जिद्द, चिकाटी आणि अहोरात्र कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश खेचून आणले आहे. त्यांच्या या यशामुळे पाटणकर कुटुंबीयांचे स्वप्न साकार झाले असून राजापूरकरांची मान उंचावली आहे.
दानिश यांच्या या यशात त्यांचे वडील श्री. माजीद पाटणकर आणि आई-वडिलांच्या संस्कारांचा तसेच मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. ग्रामीण भागातून येऊनही योग्य ध्येय निश्चित केले तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते, हे दानिश यांनी सिद्ध करून दाखवले आहे. राजापूरचे पहिले मुस्लिम सीए होण्याचा मान मिळाल्याने मुस्लिम समाजासह सर्व धर्मीय बांधवांकडून आणि विविध सामाजिक संस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशाने राजापूरच्या अनेक विद्यार्थी आणि युवकांसमोर एक नवीन आदर्श निर्माण झाला असून, त्यांना उच्च शिक्षण घेण्याची व सीए सारख्या वाणिज्य क्षेत्रातील सर्वोच्च पदवी मिळवण्याची प्रेरणा मिळणार आहे. दानिश पाटणकर यांच्या पुढील वाटचालीस राजापूर शहरवासीयांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.






