GRAMIN SEARCH BANNER

माभळे पंचायत समिती गणातून जमूरत अलजी यांना उमेदवारी देण्याची जनतेतून जोरदार मागणी

Gramin Varta
247 Views

संगमेश्वर / एजाज पटेल : येत्या काही दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची चर्चा रंगत असतानाच, कुरधूंडा गावचे माजी सरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उच्च शिक्षित, अभ्यासू आणि अनुभवी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे जमूरत अलजी यांनी आगामी पंचायत समिती निवडणूक माभळे गणातून लढवावी, अशी जोरदार मागणी गणातील जनतेतून पुढे येत आहे. त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक-राजकीय कार्याची, विकासाभिमुख दृष्टीकोनाची आणि लोकांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची हीच पावती असल्याचे बोलले जात आहे.

सन २००५ मध्ये जमूरत अलजी यांनी ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात उतरून प्रथमच विजय मिळवला. उच्च शिक्षण घेतलेले आणि आधुनिक प्रशासनाची जाण असलेले जमूरत अलजी अगदी तरुण वयात सरपंच झाले. गावकऱ्यांनी त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवत सरपंचपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली. पहिल्याच पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन रस्ते, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता, सामाजिक सुविधा आदी अनेक विकासकामे मार्गी लावली.

त्यांच्या नियोजनबद्ध कार्यशैलीमुळे, शिक्षणातून मिळालेल्या दृष्टीकोनामुळे आणि सर्वसामान्यांशी असलेल्या थेट संपर्कामुळेच सलग तीन वेळा त्यांच्यावर सरपंचपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. महिला आरक्षण लागू झाल्यानंतर त्यांच्या पत्नीना  सरपंचपदाची संधी गावाने दिली. त्या काळातही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या गावाच्या विकासात जमूरत अलजी यांचे मार्गदर्शन आणि योगदान सातत्याने राहिले.

जमूरत अलजी यांना सामाजिक व राजकीय कार्याचा वारसा घरातूनच लाभलेला आहे. त्यांचे वडील सन १९५८ साली सरपंच होते आणि त्यांनी सलग ३५ वर्षे सरपंचपद भूषवले. वडिलांकडून मिळालेली सामाजिक बांधिलकी आणि स्वतःच्या उच्च शिक्षणाची जोड यामुळे जमूरत अलजी यांनी लोकहिताला प्राधान्य देत प्रभावी काम केल्याची त्यांची ओळख आहे.

त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे आणि प्रामाणिक, पारदर्शक कार्यपद्धतीमुळे कुरधूंडा गावासह संपूर्ण माभळे गणात त्यांच्यावर जनतेचा ठाम विश्वास आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांचे ते निकटवर्तीय व खंदे कार्यकर्ते मानले जातात. या संबंधांमुळे परिसरात अनेक विकासकामे मंजूर करून आणण्यात त्यांना यश मिळाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

उदय सामंत यांनी त्यांच्यावर शिवसेना शिंदे गट उप तालुका प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्याचबरोबर पक्षातील विविध पदे तसेच सामाजिक संघटनांमधील जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. उच्च शिक्षण, अनुभव आणि व्यापक जनसंपर्क यांचा मेळ त्यांच्या कार्यात सातत्याने दिसून येतो.
या सर्व पार्श्वभूमीवर माभळे पंचायत समिती गणातून उच्च शिक्षित, अनुभवी आणि विकासकेंद्रित नेतृत्व म्हणून जमूरत अलजी यांनी निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी जनतेतून होत आहे. त्यांच्या अनुभवाचा, शिक्षणातून आलेल्या आधुनिक दृष्टिकोनाचा आणि लोकविश्वासाचा फायदा आगामी निवडणुकीत नक्कीच होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पक्षाने लोकभावनेची दखल घेऊन त्यांना अधिकृत उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी गणातील नागरिकांकडून होत आहे.

Total Visitor Counter

3374648
Share This Article