GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत कार – दुचाकी भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर, तिघे जखमी

Gramin Varta
168 Views

दापोली : नववर्षाच्या स्वागताचा आनंद अद्याप ओसरलेला नसतानाच दापोली शहरात अपघाताने खळबळ उडाली. दापोली–हर्णे मुख्य रस्त्यावर तहसील कार्यालयासमोर दुचाकी व चारचाकी वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन तीन जण जखमी झाले. मंगळवार, १ जानेवारी रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. धडकेचा आवाज इतका तीव्र होता की काही क्षणातच नागरिकांची गर्दी जमली.

अपघातात चारचाकीतील प्रज्वल देवधर व विराज वणे यांना दुखापत झाली असून दुचाकीस्वार सुदर्शन बहिरे हे गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांनी तातडीने मदतीचा हात पुढे करत जखमींना दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेत दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दरम्यान, दुचाकी चालक मद्यप्राशनाच्या अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती असून याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. अपघातस्थळी रस्त्याच्या कडेला कायमस्वरूपी उभी राहणारी वाहने ही मोठी डोकेदुखी ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. एका बाजूला स्कूल बस तर दुसऱ्या बाजूला फूड व्हॅन उभी राहत असल्याने रस्ता अरुंद होऊन अपघातांची शक्यता वाढत असल्याचा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला.

या परिसरात वारंवार अपघात घडत असून प्रशासनाने तातडीने अडथळा ठरणारी वाहने हटवावीत, वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3369328
Share This Article