रत्नागिरी : शहरातील राम आळी परिसरात गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या विचित्र अपघातात हॉट चिप्स दुकानातील उकळत्या तेलाच्या कढईला उनाड गायीचा धक्का लागून तेल अंगावर सांडल्याने दोन तरुण भाजून जखमी झाले. सिद्धेश प्रकाश दळवी (26, रा. कोळंबे, रत्नागिरी) आणि दीपक सुरेश कोलापटे (26, रा. झारणी रोड, रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत.
सिद्धेश आणि दीपक हे गुरुवारी सायंकाळी राम आळी येथील एका हॉट चिप्स दुकानाबाहेर उभे होते. रात्री सुमारे 8.45 वाजण्याच्या सुमारास दुकानासमोरून जाणाऱ्या एका उनाड गायीचा अचानक दुकानातील तेलाच्या कढईला धक्का लागला. त्यामुळे कढईतील उकळते तेल बाहेर सांडले आणि ते दोघांच्या अंगावर पडल्याने ते भाजून जखमी झाले.
घटनेनंतर तातडीने त्यांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद घेऊन पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
रत्नागिरीत उनाड गायीच्या धडकेत कढईतील उकळते तेल अंगावर पडून दोघे तरुण भाजले






