संगमेश्वर / एजाज पटेल
संगमेश्वर तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर मानवी जीवनासाठी चिंतेचा विषय ठरत असतानाच मंगळवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी बोरसूत येथील शिंदेवाडी परिसरात घडलेली घटना हळहळजनक ठरली. कोसुंब–फणसवळे रस्त्याच्या कडेला एक बिबट्या बसलेल्या अवस्थेत अत्यंत अशक्त स्थितीत आढळून आला होता.
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच बिबट्याचे प्राण वाचावेत, या उद्देशाने वनविभागाच्या पथकाने अत्यंत काळजीपूर्वक पिंजऱ्याच्या साह्याने त्याला ताब्यात घेतले. पाहणीत संबंधित बिबट्या फारच अशक्त असल्याचे स्पष्ट झाले होते.
त्यानंतर तात्काळ पुढील उपचारासाठी बिबट्याला टी.टी. सेंटर, पुणे येथे रवाना करण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचारासाठी नेत असतानाच या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. मृत बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे पाच ते सहा वर्षे असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांसह वन्यप्राणीप्रेमींमध्ये तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
माननीय सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघु चिकित्सालय देवरुख यांच्या उपस्थितीत मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले असून, नियमानुसार सर्व अवयव जाळून नष्ट करण्यात आले आहेत. या प्रकरणी वनपाल संगमेश्वर–देवरुख यांनी प्र.गु.रि. क्रमांक वप्रार ०२/२०२६ दिनांक १५/०१/२०२६ नुसार नोंद केली आहे.
सदर कारवाई ही विभागीय वनाधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड व वनाधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल देवरुख सागर गोसावी, वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडूकर, सुप्रिया काळे व सुरज तेली यांनी पार पाडली.
दरम्यान, संगमेश्वर तालुक्यात जंगलालगत वाढत असलेली मानवी वस्ती, मोकाट जनावरे तसेच जंगलातील अधिवासात होत असलेले बदल यामुळे बिबट्यांचा मानवी वस्तीजवळील वावर वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष सतर्कता बाळगावी, लहान मुलांवर लक्ष ठेवावे आणि कोणताही वन्यप्राणी आढळल्यास स्वतः हस्तक्षेप न करता तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच अशा घटनांबाबत किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ वर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांनी केले आहे.





