GRAMIN SEARCH BANNER

राजापूर महसूल कार्यालयातून कणेरी गावचे रेकॉर्ड गायब

Gramin Varta
107 Views

सुरेश शिरवडकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

राजापूर : येथील तहसीलदार कार्यालयातील महसूल दप्तरी मौजे कणेरी गावाशी संबंधित महत्त्वाच्या नोंदी आढळून येत नसल्याची गंभीर तक्रार कणेरी भंडारवाडी येथील ग्रामस्थ सुरेश चतुर शिरवडकर यांनी जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात शिरवडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, त्यांनी नमूद केले आहे की ११ जुलै २०२५ रोजी त्यांनी राजापूर तहसीलदार कार्यालयात मौजे कणेरी गावातील सर्व्हे नंबर १०, हिस्सा नंबर ९ या जमिनीच्या कुळ नोंदीची माहिती मिळावी म्हणून आवश्यक कागदपत्रांच्या नकलांसाठी अर्ज केला होता. मात्र, तहसीलदार कार्यालयाकडून संबंधित दस्तऐवज व नोंदी उपलब्ध नसल्याचे त्यांना कळविण्यात आले.

राजापूर तालुक्यातील इतर अनेक लहान-मोठ्या गावांमधील सातबारा, फेरफार तसेच कुळ नोंदी महसूल दप्तरी उपलब्ध असून, अनेक नागरिकांनी रितसर अर्ज करून त्याच्या नकलाही प्राप्त केल्या आहेत. असे असताना केवळ कणेरी गावातील नोंदीच का आढळून येत नाहीत, असा सवाल शिरवडकर यांनी आपल्या तक्रार अर्जातून उपस्थित केला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून कणेरी गावाच्या नोंदी नेमक्या कशा गहाळ झाल्या, याचा शोध घ्यावा तसेच आपण मागितलेल्या दस्तऐवजांच्या नकलांची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Total Visitor Counter

3369326
Share This Article