लांजा : तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व ११ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. साहिल दत्ताराम मसणे (वय २१, रा. लांजा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
जुलै २०२२ मध्ये घडलेल्या या घटनेत पीडिता अल्पवयीन असल्याची पूर्ण जाणीव असूनही आरोपीने तिच्याशी लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिल्यानंतर कुटुंबीयांनी केलेल्या चौकशीत संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर लांजा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा निकाल रत्नागिरी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी दिला. सरकार पक्षातर्फे अॅड. मेघना नलावडे यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले.
प्रकरणाचा तपास लांजा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्विनी पाटील यांनी करून आरोपीला अटक केली होती. तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सादर पुरावे व साक्षींच्या आधारे न्यायालयाने आरोपी दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली.
लांजातील अल्पवयीन मुलीशी लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला 20 वर्षे कारावास






