GRAMIN SEARCH BANNER

डिंगणी गावच्या मधुरा मिथुन निकम यांची अपक्ष उमेदवारी; परचुरी पंचायत समिती निवडणुकीत उत्साहाचे वातावरण

Gramin Varta
186 Views

संगमेश्वर / एजाज पटेल : डिंगणी येथील सामाजिक कार्यकर्त्या मधुरा मिथुन निकम यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा हाती न घेता थेट अपक्ष उमेदवारी स्वीकारत परचुरी पंचायत समिती गणातून निवडणुकीसाठी आज अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या निर्णयामुळे पंचायत समिती गणात राजकीय चर्चांना वेग आला असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मधुरा निकम या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून महिला सक्षमीकरण, ग्रामविकास, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच युवकांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे. कोणत्याही पक्षाशी बांधिलकी न ठेवता केवळ लोकांच्या प्रश्नांसाठी काम करणारी कार्यकर्ती म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळेच पंचायत समिती गणातील नागरिकांनी “आपल्यातीलच एक कार्यकर्ती सभागृहात गेली पाहिजे” असा आग्रह धरत त्यांना निवडणूक लढविण्याची मागणी केली होती.
राजकीय पक्षांपलीकडे जाऊन विकासाला प्राधान्य देणारा प्रतिनिधी पंचायत समितीमध्ये हवा, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. मधुरा निकम पंचायत समिती सभागृहात गेल्यास विकासकामांना गती मिळेल, योजनांचा लाभ थेट गरजूंपर्यंत पोहोचेल आणि प्रशासकीय पातळीवर लोकांच्या प्रश्नांना प्रभावी आवाज मिळेल, असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

आज उमेदवारी अर्ज दाखल होताच समर्थकांनी आनंद व्यक्त केला. यावेळी बोलताना अनेक ग्रामस्थांनी सांगितले की, “ही निवडणूक पक्षावर नव्हे तर व्यक्तीच्या कामावर आणि विश्वासावर लढवली जाणार आहे.” पक्षीय राजकारणाला कंटाळलेले मतदार अपक्ष व स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराकडे आशेने पाहत असल्याचे चित्र सध्या परचुरी पंचायत समिती गणात दिसून येत आहे.

दरम्यान, मधुरा निकम यांचे पती मिथुन शेठ निकम हेही सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून प्रचारात त्यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. यावेळी मधुरा निकम यांचे सहकारी आणि समर्थकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास दिसून येत असून, “या वेळी परचुरी गणात मिथुन शेठ निकम ‘’वन टू का फोर”करणारच,” असे छातीठोकपणे सांगितले जात आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापले असून निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत.

आगामी काळात मधुरा निकम यांचा प्रचार विकासकेंद्री, पारदर्शक व लोकसहभागावर आधारित असेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे परचुरी पंचायत समिती निवडणुकीत वेगळेच चैतन्य निर्माण झाले आहे.

Total Visitor Counter

3199305
Share This Article