GRAMIN SEARCH BANNER

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा १८ कोटींचा परतावा थकित; रत्नागिरीतील रुग्णालये निधीच्या प्रतीक्षेत

Gramin Varta
22 Views

रत्नागिरी : जिल्ह्यातील सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत केलेल्या वैद्यकीय उपचारांच्या खर्चाचा परतावा मागील जुलै महिन्यापासून मिळालेला नाही. या योजनेचा परतावा नियमानुसार ४५ दिवसांच्या आत मिळणे आवश्यक असताना, अनेक महिन्यांपासून निधी रखडल्याने जिल्ह्याची एकूण थकबाकी आता १८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सर्वसामान्यांसाठी संजीवनी ठरलेली ही योजना सध्या निधीच्या टंचाईत अडकली असून, परतावा मिळत नसल्यामुळे खासगी रुग्णालयांकडून यापुढे उपचार करण्याबाबत नकारात्मक भूमिका घेतली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यातील अनेक रुग्णालयांनी कोट्यवधी रुपये थकल्याच्या तक्रारी केल्या होत्या, मात्र समन्वयाकडे संपर्क करूनही त्यावर कोणताही तोडगा निघाला नव्हता. या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक आरोग्य विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीनुसार, १ हजार १६२ कोटी ८ लाख ६३ हजार ३२१ रुपयांचा निधी राज्य आरोग्य हमी सोसायटीला देण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या मोठ्या निधीला मंजुरी मिळाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा थकित परतावा लवकरच मिळेल आणि रुग्णालयांची प्रतीक्षा संपेल अशी आशा आता निर्माण झाली आहे. दरवर्षी हजारो रुग्ण या योजनेचा लाभ घेतात, त्यामुळे हा निधी वेळेत मिळणे आरोग्य व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

Total Visitor Counter

3072146
Share This Article