रत्नागिरी: इजिप्तची राजधानी कैरो येथे पार पडलेल्या दिमाखदार साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा मानाचा ‘लोकमत वन वर्ल्ड’ पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांना प्रदान करण्यात आला.
भारत आणि इजिप्तमधील ऐतिहासिक मैत्रीचे प्रतिबिंब या ‘वन वर्ल्ड’ संकल्पनेत उमटलेले पाहायला मिळाले. लोकमत समूहाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्याला भारतीय उद्योग, कला, साहित्य, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. प्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी, श्रीमती अमृता फडणवीस, अभिनेत्री सौंदर्य शर्मा यांसारख्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
पुरस्कार स्वीकारताना भावना व्यक्त करताना प्रा. ढवळ म्हणाले, हा पुरस्कार मी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक आणि माझ्या सर्व हितचिंतकांना अर्पण करतो. माझ्या आई-वडिलांनी आणि कुटुंबाने दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी समाजासाठी खारीचा वाटा उचलू शकलो. इजिप्तसारख्या भव्य दिव्य शहरात हा सन्मान मिळणे हे मी माझे भाग्य समजतो.
साहित्यिक मूल्ये जपण्यासोबतच शैक्षणिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या योगदानामुळे त्यांची निवड करण्यात आली.
कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ इजिप्तमध्ये सन्मानित






