GRAMIN SEARCH BANNER

कोकणात शिमगोत्सवाची चाहूल

रत्नागिरी: कोकणात शिमगोत्सवाची चाहूल लागली असून गावागावांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पारंपरिक ढोल-ताशांच्या निनादात आणि रंगीबेरंगी मिरवणुकांच्या तयारीत संपूर्ण परिसर दुमदुमू लागला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गावांमध्ये ग्रामदैवतांच्या पालख्या, पारंपरिक नृत्यप्रकार, तसेच दशावतारी नाट्यप्रयोगांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कोकणातील शिमगोत्सव धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचा सोहळा मानला जातो. गावांमध्ये होळीकुंडासाठी लाकूडफाटा जमा करण्याची लगबग सुरू झाली आहे.

पारंपरिक वेशभूषा, मुखवटे आणि रंगोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी वाढली आहे. अनेक ठिकाणी भजन, कीर्तन आणि जागराचीही आखणी करण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाने सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त व स्वच्छतेची विशेष तयारी केली आहे. पर्यटकांचीही कोकणाकडे ओढ वाढण्याची शक्यता असल्याने पर्यटन व्यावसायालाही चालना मिळणार आहे.

शिमगोत्सवासाठी लाखो चाकरमानी मुंबई, पुण्याहून कोकणात येणार असल्याने एसटी सज्ज झाली आहे. कोकणात येण्यासाठी सुमारे १९८ जादा फेऱ्या सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळ करत आहे. होळीच्या काळात प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, वेगवान, स्वस्त व्हावा यासाठी एसटी महामंडळाने वाढीव फेऱ्या सोडण्याचे नियोजन केले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या विभागांतून सुमारे २०० जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. होळीनिमित्त हजारो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुलभ व्हावा यादृष्टीने प्रयत्न सुरू असून, या विशेष मोहिमेत सर्वाधिक फेऱ्यांचे नियोजन ठाणे आणि मुंबई विभागांतून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कोकण रेल्वेही चाकरमान्यांसाठी सज्ज झाली आहे. रेल्वेच्या अनेक जादा फेऱ्या कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात येणार आहेत. आतापर्यंत जाहीर झालेल्या सर्व गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे.

Total Visitor Counter

3486461
Share This Article