रत्नागिरी: शहरातील केशवनगर परिसरात घडलेल्या एका थरारक घटनेने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील खिडकीत सात वर्षांचा मुलगा अडकल्याचे दृश्य समोर आल्यानंतर काही क्षणांतच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. इतक्या उंच मजल्यावर हा चिमुकला नेमका कसा अडकला, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला होता.
रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या नजरेस ही घटना येताच त्यांनी आरडाओरडा केला. आवाज ऐकताच इमारतीखाली लोकांची गर्दी जमली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ रत्नागिरी एमआयडीसी अग्निशमन दल यांना माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या शिडीच्या सहाय्याने त्यांनी अतिशय काळजीपूर्वक आणि कौशल्याने त्या मुलाला सुखरूप बाहेर काढले. मुलगा सुरक्षित खाली आल्यानंतर उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात; मात्र शांत समजल्या जाणाऱ्या रत्नागिरीत अशी घटना घडल्याने नागरिकांना चांगलाच धक्का बसला असून, इमारतीतील सुरक्षिततेबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
तिसऱ्या मजल्यावर खिडकीत अडकलेल्या सात वर्षांचा मुलाची अग्निशमन दलाकडून सुटका





