GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणात खळबळजनक प्रकार ! माहिती अधिकार कार्यकर्त्याला ठार मारण्याचा रचला कट; सहा जणांविरुद्ध गुन्हा

गाडीखाली चिरडून टाकण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप

रत्नागिरी: चिपळूण तालुक्यातील अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला जीवे मारण्याचा कट रचल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. नागावे येथील ग्रामदेवता श्री सुकाई देवी मंदिरासमोर बेकायदेशीररीत्या बांधलेला चौथरा काढल्याच्या रागातून आणि माहिती अधिकारात विचारलेल्या माहितीचा सूड घेण्याच्या उद्देशाने हा कट रचण्यात आल्याची तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे. सुरेश राजाराम पालांडे, सुचिद चंद्रकांत पालांडे, घनश्याम राजाराम पालांडे, चंद्रकांत शंकर पालांडे, शिवाजी दत्ताराम पालांडे आणि श्रीकांत शंकर पालांडे (सर्व रा. नागावे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 6 जणांची नावे आहेत. संगनमताने षडयंत्र रचणे, धमकी देणे आणि जातीवाचक छळ करणे अशा विविध कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश बाबू चिपळूणकर (वय ५८, रा. नागावे) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. आरोपींच्या कुटुंबाने ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर अंत्यसंस्कारासाठी एक अनधिकृत चौथरा बांधला होता. या बांधकामामुळे ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेल्याने ग्रामपंचायतीने तो चौथरा काढून टाकण्यासाठी नोटीस बजावली होती. तरीही तो न काढल्याने अखेर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी मिळून तो चौथरा हटवला. या कारवाईत फिर्यादी चिपळूणकर यांचा थेट सहभाग नसतानाही, आरोपींनी त्यांच्याबद्दल द्वेष धरून त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दिली. या वादाचे स्वरूप पुढे अधिक गंभीर झाले. आरोपींनी फिर्यादींना गाडीखाली चिरडून मारण्यासाठी एका माणसाची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या एका मित्राला फोन करून असा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, आरोपींच्या बिअर बार आणि परमिट रूमबाबत फिर्यादींनी माहिती अधिकारात अर्ज केल्याचा रागही आरोपींच्या मनात होता. फिर्यादी हे अनुसूचित जातीचे असल्याचे माहित असतानाही, त्यांना लक्ष्य करून खोट्या तक्रारी करणे आणि ‘माहिती अधिकाराचे पत्र मागे घ्या, अन्यथा टोकाचे पाऊल उचलून शेवट करावा लागेल’ अशी धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

Total Visitor Counter

3485118
Share This Article