GRAMIN SEARCH BANNER

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी चिपळूण आगारात कर्मचाऱ्यांची होणार ‘अल्कोटेस्ट’; पुढील आठवड्यापासून अंमलबजावणी

Gramin Varta
18 Views

चिपळूण: एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी चिपळूण आगाराने कडक पाऊल उचलले आहे. येत्या पुढील आठवड्यापासून आगारातील कर्मचाऱ्यांची अल्कोटेस्ट मशिनद्वारे ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणी सक्तीने घेतली जाणार असल्याची माहिती आगारप्रमुख दीपक चव्हाण यांनी दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवाकाळातील मद्यपानाला आळा घालण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, यामुळे बससेवा अधिक शिस्तबद्ध होण्यास मदत होणार आहे.

चिपळूण आगारात सुमारे ६०० कर्मचारी कार्यरत असून, बहुतांश कर्मचारी आपले कर्तव्य चोख बजावतात. मात्र, काही कर्मचारी ड्युटीवर असताना व्यसन करत असल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर, आता आगारात कामावर हजर होणाऱ्या चालकांची वाहन परीक्षकांकडून नियमित तपासणी केली जाणार आहे. तसेच वाहकांना ड्युटी देण्यापूर्वी त्यांची अल्कोटेस्ट मशिनद्वारे तपासणी करून त्याची रीतसर नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, वाहतूक निरीक्षक आणि वाहतूक नियंत्रक यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.आगारप्रमुख दीपक चव्हाण यांनी स्पष्ट केले की, चालकाने बस मार्गावर असताना नियंत्रण कक्षात लॉगबुकची नोंद करणे आवश्यक आहे. तसेच आगार आणि बसस्थानक परिसरातील विश्रांतीगृहात थांबणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. यापूर्वी आगारातील अल्कोटेस्ट मशिनमध्ये बिघाड झाल्याने ती दुरुस्तीसाठी पाठवण्यात आली होती. ही मशिन पुढील आठवड्यात दाखल होताच प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होईल. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, सेवेत असताना मद्यपान करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाईसह प्रसंगी पोलिसांत तक्रारही नोंदवली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Total Visitor Counter

3370202
Share This Article