गणपतीपुळे / वैभव पवार: जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या गणपतीपुळे नजीकच्या निसर्गरम्य मालगुंड गावाचा आता पर्यटनाच्या दृष्टीने वेगाने कायापालट होताना दिसत आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या गावाला आधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य केशवसुत यांची जन्मभूमी अशीही ओळख आहे. येथे केशवसुतांचे देखणे स्मारक तसेच त्यांचे कौलारू जन्मघर पर्यटकांना आकर्षित करत असते.कवितेची राजधानी मानल्या जाणाऱ्या या भूमीत येणाऱ्या पर्यटकांना आणखी एक रमणीय पर्यटनस्थळ अनुभवता यावे, यासाठी मालगुंड ग्रामपंचायतीने पर्यटन विकासाच्या कामांवर भर दिला आहे.
त्याचाच एक भाग म्हणून तळेपाट परिसरातील ‘शुभ्रकमळ’ तलावाचा पर्यटनात्मक विकास करण्याचे काम हाती घेण्यात आले असून सध्या तलावाच्या सुशोभीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत.रत्नागिरी जिल्हा पर्यटन विकास आराखड्यातून या कामासाठी निधी उपलब्ध झाला असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मालगुंड ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या या तलावाच्या सुशोभीकरणाकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.सध्या तलावाच्या परिसरात आकर्षक रचना, सुशोभीकरण आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या विविध सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे.
हे काम रत्नागिरीतील नामांकित ठेकेदार भैय्या शिंदे यांच्या कल्पकतेतून साकारत असल्याची माहिती मिळत आहे.येत्या काही दिवसांत या सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर ‘शुभ्रकमळ’ तलाव परिसर नव्या रूपात पर्यटकांसमोर येणार आहे. त्यामुळे मालगुंडमध्ये एका नव्या प्रेक्षणीय पर्यटनस्थळाची भर पडणार असून विविध भागांतील पर्यटक या ठिकाणी आकर्षित होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.दरम्यान, तलावाचा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास झाल्यास तळेपाट परिसरातील स्थानिक तरुण आणि ग्रामस्थांना पर्यटनाधारित रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत. त्यामुळे पर्यटनवाढीसाठी मालगुंड ग्रामपंचायतीकडून हा पुढाकार घेतल्याबद्दल स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.





