GRAMIN SEARCH BANNER

होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर इराणकडून २० लाख डॉलर्स शुल्क

Gramin Varta
147 Views

तेहरान: पश्चिम आशियामध्ये सुरू असलेले संकट अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. आता इराणने जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुज जलडमरूमधून जाणाऱ्या जहाजांवर निश्चित शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

मीडिया अहवालांनुसार हे शुल्क २० लाख डॉलर्स (सुमारे १८ कोटी रुपये) इतके असेल. इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणी संसदेतल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सदस्य अलाएद्दीन बोरोजेर्दी यांनी ही माहिती दिली असून हे शुल्क लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अलाएद्दीन बोरोजेर्दी यांनी सांगितले की, होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजांवर शुल्क लावण्याचा निर्णय हा नव्या सार्वभौम व्यवस्थेच्या स्थापनेचे प्रतीक आहे. ते म्हणाले, “जलडमरूमधून प्रवास करणाऱ्या काही जहाजांकडून वाहतूक शुल्क म्हणून २० लाख डॉलर्स वसूल करणे हे इराणच्या सामर्थ्याचे प्रदर्शन आहे.” पुढे ते म्हणाले, “युद्धाची एक किंमत असते, त्यामुळे स्वाभाविकपणे आम्हाला असे पाऊल उचलावे लागेल.”

बोरोजेर्दी यांची ही प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर समोर आली आहे. ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांच्या आत होर्मुज जलडमरूमध्य पूर्णपणे खुला करण्यास सांगितले होते. त्यांनी इशारा दिला की, इराणने तसे केले नाही तर अमेरिकेकडून इराणमधील वीज प्रकल्पांवर हल्ला केला जाईल.दरम्यान, इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी अलीकडील एका वक्तव्यात म्हटले होते की, होर्मुजचा मार्ग इराणच्या शत्रूंना वगळता इतर सर्व देशांसाठी खुला आहे. मात्र या विधानानंतर आता इराणी खासदारांकडूनच होर्मुजमार्गे जाणाऱ्या जहाजांवर मोठे शुल्क लावण्याची भूमिका मांडली जात आहे.

होर्मुज जलडमरूमध्य हा जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक मानला जातो. या मार्गातून जगातील सुमारे २० टक्के तेल आणि गॅस पुरवठा होतो. हा मार्ग बंद झाल्यास जागतिक बाजारात तेल आणि गॅसच्या किंमती झपाट्याने वाढू शकतात. अलीकडील हल्ले आणि वाढत्या तणावामुळे ऊर्जा बाजारात आधीच मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. इराणच्या सागरी सीमेजवळ असलेला होर्मुज हा अतिशय अरुंद समुद्री मार्ग असून जागतिक तेल निर्यातीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावर इराणला रणनीतिक आघाडी असून आवश्यक असल्यास तो पुरवठा अडवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.

Total Visitor Counter

3202258
Share This Article