GRAMIN SEARCH BANNER

कराड-चिपळूण मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल; पाटणमधील पुलाच्या कामासाठी ६० दिवस मार्ग बंद

Gramin Varta
483 Views

चिपळूण: पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६-ई वरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले असून, हा मार्ग पुढील ६० दिवसांसाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाटण शहरातील धांडे पुलाची पुनर्बांधणी आणि बाजारपेठेतील काँक्रीट रस्त्याचे काम अत्यंत महत्त्वाचे असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३४ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ही अधिसूचना जारी केली आहे. या कामासाठी लागणारा प्रदीर्घ कालावधी लक्षात घेता २७ मार्च २०२६ रोजी पहाटे ००.०१ वाजेपासून ते २७ मे २०२६ रोजी रात्री २३.५९ वाजेपर्यंत हा बदल लागू राहणार असून वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

​या अधिसूचनेनुसार, कराड आणि उंब्रज बाजून कडून चिपळूणकडे जाणारी जड व अवजड वाहतूक आता राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरून पाचवड फाटा, उंडाळे, कोकरूड, मलकापूर, आंबा घाट आणि संगमेश्वरमार्गे चिपळूणला जाईल. तसेच चिपळूणकडून कराड-उंब्रजकडे येणाऱ्या अवजड वाहनांनाही याच मार्गाचा उलट दिशेने म्हणजेच संगमेश्वर, आंबा घाट, मलकापूर आणि उंडाळेमार्गे प्रवास करावा लागणार आहे. हलक्या वाहनांच्या सोयीसाठी नवारस्ता, गव्हाणवाडी फाटा, नेरळे आणि गौंड या मार्गाची उपलब्धता करून देण्यात आली असून चिपळूणकडे जाणारी व येणारी सर्व हलकी वाहने याच पर्यायी मार्गावरून मार्गस्थ होतील.

​पुलाच्या पुनर्बांधणीमुळे होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे, त्या सर्व मोक्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस दलाने या बदलांची सर्व वाहनचालक व नागरिकांनी नोंद घ्यावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. या ऐतिहासिक बाजारपेठेतील कामामुळे प्रवासाच्या वेळेत काही प्रमाणात वाढ होणार असली तरी, भविष्यातील रस्ते सुविधेसाठी हे काम अनिवार्य असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3374732
Share This Article