GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीतील अनधिकृत टपऱ्या, दुकाने हटाव मोहिमेला कोकणनगरपासून होणार सुरुवात; १७ जानेवारीपर्यंत मुदत

Gramin Varta
648 Views

रत्नागिरी : शहरातील मुख्य रस्ते, गटारे व पदपथांवर वाढलेल्या अनधिकृत टपऱ्या, दुकाने आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर आता प्रशासनाचा कडक हात पडण्याची चिन्हे आहेत. नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहिमेची जोरदार पूर्वतयारी सुरू असून, या कारवाईची सुरुवात कोकणनगर परिसरातून करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबतची अधिकृत नोटीस नुकतीच पालिकेकडून काढण्यात आली आहे.

कोकणनगर परिसर शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या भागाच्या जवळच रत्नागिरी विमानतळ, तटरक्षक दलाचे केंद्र तसेच मिरजोळे एमआयडीसी असून, विमानतळ लवकरच व्यावसायिक सेवेसाठी खुला होण्याच्या तयारीत आहे. विमानतळ आणि तटरक्षक दलाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली वीज वाहिनी जमिनीखालून टाकण्याचे काम प्रस्तावित आहे. मात्र, रस्त्यालगत उभारलेल्या अनधिकृत बांधकामांमुळे हे काम अडथळ्यात येत आहे.

पालिकेच्या नोटीसीनुसार, ज्या नागरिकांनी किंवा व्यावसायिकांनी मुख्य रस्ते, गटारे किंवा पदपथांवर अतिक्रमणे केली आहेत, त्यांनी ती येत्या १७ जानेवारीपर्यंत स्वतःहून काढून घेणे बंधनकारक आहे. अनेक इमारतींमधील दुकानदारांनी मोकळ्या जागांमध्ये पत्र्याच्या शेड उभारून तिथे साहित्य साठवले आहे किंवा त्या जागा भाड्याने दिल्या आहेत. तसेच सांडपाणी निचऱ्यासाठी असलेल्या गटारांवरही अनधिकृत खोकी उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

मुख्य रस्त्यांवर अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या आणि टपऱ्यांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असून, शहराच्या विकासासाठी तसेच विमानतळासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी रस्ते मोकळे असणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यासाठी संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, ठरलेल्या मुदतीत प्रतिसाद न मिळाल्यास पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.

व्यावसायिकांनी आणि नागरिकांनी सहकार्य करत स्वयंस्फूर्तपणे अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा रत्नागिरी नगरपालिकेकडून देण्यात आला आहे. १७ जानेवारीची मुदत संपल्यानंतर कडक बंदोबस्तात ही मोहीम हाती घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Total Visitor Counter

3072103
Share This Article