GRAMIN SEARCH BANNER

सावर्डे येथे जुन्या वादातून चालकावर प्राणघातक हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
270 Views

सावर्डे: सावर्डे येथील हॉटेल ‘गुड लक’ बिअरबारमध्ये बियर पार्सल घेण्यासाठी गेलेल्या एका ४९ वर्षीय चालकाला जुन्या वादाचा राग मनात धरून एकाच कुटुंबातील तिघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व इतर वस्तूंचेही मोठे नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात उभयचंद मोहिरे, प्रितेश मोहिरे आणि रेखा मोहिरे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप शिवराम जाधव (रा. सावर्डे) हे २३ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सावर्डे येथील हॉटेल ‘गुड लक’ येथे गेले होते. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या उभयचंद आत्माराम मोहिरे, प्रितेश आत्माराम मोहिरे आणि रेखा आत्माराम मोहिरे यांनी दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादाची कुरापत काढून फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रेखा मोहिरे यांनी फिर्यादीला धरून ठेवले, तर उभयचंद आणि प्रितेश मोहिरे यांनी काठी, हाताचे ठोसे आणि लाथाबुक्क्यांनी त्यांच्या डोक्यात, पाठीवर, छातीवर आणि पोटावर बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, फिर्यादीला जमिनीवर पाडून त्यांच्याच पायातील बूट काढून त्या बुटाने डोक्यावर आणि कानाखाली मारून गंभीर दुखापत केली.

या हिंसक हाणामारीत प्रदीप जाधव यांचा चष्मा, दोन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे ब्रेसलेट, रुद्राक्षाची माळ आणि ब्लूटूथ तोडून त्यांचे आर्थिक नुकसान करण्यात आले आहे. घटनेनंतर प्रितेश आणि रेखा मोहिरे यांनी फिर्यादीच्या घरापर्यंत त्यांचा पाठलाग केला. तेथे फिर्यादीच्या पत्नीलाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली व पुन्हा हाताने मारहाण केली. याप्रकरणी प्रदीप जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावर्डे पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३२४ (४) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3376918
Share This Article